scorecardresearch

२०२६-२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना  एकात्मिक आणि द्विभाषिक पुस्तकांचे वितरण

शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

integrated bilingual books
(संग्रहित छायाचित्र)

शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

पुणे : राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना २०२६-२७  पर्यंत टप्प्याटप्प्याने एकात्मिक आणि द्विभाषिक, सेमी इंग्रजी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार यंदा मराठी आणि उर्दू माध्यमाच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना, मराठी माध्यमाच्या आदर्श शाळांतील दुसरीच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यात आली आहेत.

शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पनांचे अर्थ विद्यार्थ्यांना इंग्रजीतून कळले आणि शिक्षकांनी अध्यापन करताना स्पष्टीकरण केल्यास विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे होईल या विचार प्रवाहातून शालेय शिक्षण विभागाने पुस्तके द्विभाषिक करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने २०२०-२१मध्ये राज्यातील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली. मराठी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना २०२२-२३ पासून एकात्मिक आणि द्विभाषिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात सुरुवात करण्यात आल्यानंतर आता टप्प्याटप्प्याने २०२६-२७ पर्यंत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जातील.

विषयतज्ज्ञांशी सल्लामसलत करून अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एससीईआरटी), पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाची (बालभारती) असेल. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत सर्व पात्र शाळांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतील. तसेच समग्र शिक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके बालभारतीकडून खुल्या बाजारात उपलब्ध करून दिली जातील, असेही नमूद करण्यात आले आहे.

पाठ्यपुस्तके देण्याचे टप्पे २०२३-२४ मध्ये राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व शाळातील पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना, राज्यातील आदर्श शाळांतील तिसरीच्या विद्यार्थ्यांना, २०२३-२५ मध्ये राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या पहिली, दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना, राज्यातील आदर्श शाळांतील चौथीच्या विद्यार्थ्यांना, २०२५-२६ मध्ये राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना, राज्यातील आदर्श शाळांतील पाचवीच्या विद्यार्थ्यांना, तर २०२६-२७ मध्ये राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जातील. या धोरणाचा वेळोवेळी आढावा घेऊन पुढील टप्पे ठरवण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Integrated bilingual books distribution for 1 to 5 class in marathi and urdu medium schools zws

ताज्या बातम्या