scorecardresearch

प्रश्न सुटू लागल्याने चळवळींची तीव्रता कमी; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दावा

दगडांना आकार देऊन मंदिर बांधणाऱ्यांना मंदिरात प्रवेश का नाही, या भूमिकेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळा राम मंदिराचा सत्याग्रह झाला.

( रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडतर्फे आयोजित कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांनी रामदास आठवले यांची मुलाखत घेतली.)

पुणे : दगडांना आकार देऊन मंदिर बांधणाऱ्यांना मंदिरात प्रवेश का नाही, या भूमिकेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळा राम मंदिराचा सत्याग्रह झाला. बाबासाहेबांनी राज्यघटनेद्वारे दिलेल्या आरक्षणामुळे दलितांना सत्तेमध्ये वाटा मिळाला. सगळे नाही तरी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, गायरान जमिनी असे काही प्रश्न सत्तेमध्ये गेल्यानंतर मार्गी लागले. प्रश्न सुटू लागल्याने चळवळींची तीव्रता कमी झाली, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी केला.
रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडतर्फे आयोजित कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांनी आठवले यांची मुलाखत घेतली. त्या प्रसंगी ते बोलत होते. आठवले यांच्या हस्ते माजी आमदार अॅकड. एल. टी. सावंत आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष एम. डी. शेवाळे यांचा सत्कार करण्यात आला.
आज विरोधात असलेला उद्या आपल्याबरोबर असू शकतो, हे ध्यानात घेऊन मी माणसांना जपतो, असे सांगून आठवले म्हणाले,की साहित्यिकांनी केवळ लेखन न करता चळवळ करावी या उद्देशातून स्थापन झालेल्या दलित पँथरच्या चळवळीत सहभागी झालो. माझी विचारधारा आंबेडकरवादी आहे. माझ्यावर जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा प्रभाव आहे. कोणत्या पक्षाशी मैत्री केली तर सत्ता मिळेल हे मला समजते. काँग्रेससोबत असताना मंत्री आणि तीनदा खासदार झालो. शिर्डीला पराभूत झालो. मी एकमेव खासदार असताना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने मंत्री केले नाही. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली पाहिजे अशी इच्छा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदर्शित केली होती. शिवसेनेबरोबर गेल्यानंतर आता मी नरेंद्र मोदी यांच्यासमवेत काम करत आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कधीच जाऊ दिले नसते. अडीच-अडीच वर्षांच्या समन्वयाचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर यावे. त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही, असे आवाहन रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले. मशिदीवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे यांच्या भूमिकेशी मी सहमत नाही. राज ठाकरे नाही, तर उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत. ते पुन्हा आमच्याबरोबर येण्याचा निर्णय बदलत नाहीत, याचे वाईट वाटते.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे व्यक्त करून आठवले म्हणाले म्हणाले,की राज्य सरकारने एसटी कामगारांच्या भावनेचा विचार करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. उद्रेकातून हा हल्ला झाला आहे. ही घटना निंदनीय आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या कामगारांना कामावर न घेण्याची परिवहनमंत्री अनिल परब यांची भूमिका चुकीची आहे.
रामदास आठवले यांची एका शब्दांत उत्तरे
• आवडता वक्ता – मी
• आवडते साहित्यक – कुसुमाग्रज
• आवडता अभिनेता – अमिताभ बच्चन
• आवडता रंग – निळा

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Intensity movements diminished question arose union minister ramdas athavale claim amy

ताज्या बातम्या