गंभीर रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळावेत म्हणून ससून रुग्णालयातील प्रत्येक विभागात पाच खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. सध्या रुग्णालयात विविध आजारांचे १५ विभाग आहेत. प्रत्येक विभागात पाच यानुसार अतिदक्षता विभागाच्या ७५ खाटा नव्याने उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा >>> पुणे : मोक्कातील आरोपी नाना गायकवाडवर कारागृहात हल्ला
अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढल्यामुळे गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना त्वरित उपचार मिळणे शक्य होणार आहे. याची सुरूवात म्हणून अस्थिरोग विभागात सहा खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला असून, यामध्ये सध्या चार रुग्ण दाखल झाले आहेत, अशी माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांनी दिली. ससून रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागाच्या जवळपास १२० खाटा आहेत. मात्र, रुग्णालयात पुणे जिल्ह्याबरोबर राज्यभरातून रुग्ण येत असतात. परिणामी ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रुग्णाला दाखल करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. प्रत्येक विभागात खाटा उपलब्ध झाल्यास प्रतीक्षा कमी होण्याबरोबरच ताण देखील कमी होण्यास मदत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. बाह्यरुग्ण विभाग आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. रुग्णालयात प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले.