पुणे तिथे काय उणे, असे म्हटले जाते ते सर्वार्थाने खरे आहे. जीवनाचे असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात पायाभूत स्वरूपाचे काम करणारी व्यक्ती नाही. पुणेकरांनी व्यक्तिगत आणि संस्थात्मक स्वरूपात मूलभूत काम करून पुण्याच्या, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या नावलौकिकामध्ये भर घातली आहे. अशा पुणेकरांच्या काही मागण्या आणि अपेक्षादेखील आहेत. त्याची पूर्तता करण्याच्या उद्देशातून आयोजित स्नेहसंवाद कार्यक्रमात सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना थेट केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी लाभली. त्याची फलश्रुती नेमकी काय असेल, हे आगामी काळच ठरविणार असला, तरी एक चांगली सुरुवात झाली असे निश्चितपणे म्हणता येईल.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने पुण्यातील संगीत, नृत्य आणि रंगभूमी कलाकारांबरोबर आयोजित स्नेहसंवाद कार्यक्रमात केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत सहभागी झाले होते. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीकांत बडवे यांच्यासह कला क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ, तालयोगी पं. सुरेश तळवलकर, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शमा भाटे, मनीषा साठे, व्याख्याता संजय उपाध्ये, तबलावादक केदार पंडित, चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर, योगेश देशपांडे, उमेश कुलकर्णी, प्रवीण तरडे, गिरीश परदेशी, नाट्यनिर्माता अनंत पणशीकर, जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर, ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास, शौनक अभिषेकी, मंजूषा पाटील, हृषीकेश रानडे, संगीतकार राहुल रानडे, अभिनेते सुनील गोडबोले, शाहीर हेमंत मावळे, आळंदी देवस्थानचे डॉ. भावार्थ देखणे, निवेदक मिलिंद कुलकर्णी आणि सुनील महाजन यांनी चर्चेत भाग घेतला.
साहित्य, संगीत, नृत्यकला, शिल्पकला अशा विविध क्षेत्रांमध्ये पुणेकरांनी आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. तरीही सांस्कृतिक उन्नयन होण्यासाठी काही गोष्टींमध्ये पायाभूत सुविधांची पूर्तता होणे गरजेचे आहे, याकडे या स्नेहसंवादातून प्रामुख्याने लक्ष वेधण्यात आले. ‘इंटरनेट क्रांतीनंतर बौद्धिक प्रदूषणाचे आव्हान निर्माण झाले आहे. आपल्या समृद्ध परंपरा नवीन पिढीकडे संक्रमित करण्यासाठी सरकार आणि समाजाच्या स्तरावर प्रयत्न करावे लागतील. त्यामध्ये पालकांची भूमिका महत्त्वाची असेल,’ असे शेखावत यांनी सांगितले. शेखावत यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर कलाकारांनी मंत्रिमहोदयांशी संवाद साधला.
शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्यात यावे, प्रायोगिक कलांसाठी राज्यातील विद्यापीठांना निधी द्यावा, नाटकांचे आंतरराज्य आदानप्रदान व्हावे, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) धर्तीवर हिंदीप्रमाणे अन्य भाषांमध्ये नाटकांच्या निर्मितीसाठी प्रशिक्षण द्यावे, बाल चित्रपट समिती पुनर्स्थापित करावी, एकपात्री कलाकार आणि सूत्रसंचालकांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवात शास्त्रीय नृत्यांचा समावेश करावा, ‘डिजिटल इंडिया’च्या धर्तीवर ‘क्रिएटिव्ह इंडिया’ धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, लोकसंगीत टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत, शासकीय वाहिन्यांवर शास्त्रीय संगीताला स्थान द्यावे, संगीत नाटक अकादमीच्या साहाय्याने आळंदीमध्ये केंद्र सुरू करावे, केंद्र स्तरावर समिती स्थापन करून त्यावर राज्यातील कलाकारांना संधी द्यावी, कानसेन निर्मितीसाठी अकादमी स्थापन करावी, नृत्य शिक्षक या पदाची शाळांमध्ये निर्मिती करावी, विशेष मुलांना कला शिकविण्यासाठी निधी द्यावा, ‘वंदेमातरम’च्या दीडशेव्या वर्षानिमित्त नावीन्यपूर्ण कार्यक्रम करावेत, वृद्ध कलाकारांचे संमेलन आयोजित करावे, शिलालेख आणि मूर्तींचे जतन करावे, अशा विविध प्रकारच्या सूचना करण्यात आल्या. शेखावत यांनी सर्वांचे मनोगत ऐकून घेतले.
‘पुणे ही प्रतिभावंतांची भूमी आहे. संवादाची प्रक्रिया हा लोकशाहीचा गाभा आहे. कला क्षेत्रातील मंडळी साधना करणारी असतात. नेतृत्व हीदेखील एक साधना आहे. कला क्षेत्रातील साधकांच्या भावना जाणून घेण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,’ असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. ‘नुकत्याच झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवात दहा लाख पुस्तकप्रेमींनी भेट दिली. पुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी करायची आहे. कलाकारांच्या केंद्र आणि राज्य सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी स्नेहसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,’ असे पांडे म्हणाले.
vidyadhar.kulkarni@expressindia.com