‘‘पुणे हे एक विलक्षण शहर आहे. पुण्यात आलात की तुम्ही पुणेकरच होऊन जाता! तुम्हाला दुसरा इलाजच नसतो! पुणेकर होणे ही एक अपरिवर्तनीय प्रक्रिया आहे,’’ असे मत व्यक्त करत केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपण पुणेकर कसे झालो याचे किस्से उलगडले.
पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘माझे पुण्यभूषण’ या दिवाळी अंकाचे रविवारी जाधव यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. सतीश आळेकर, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, अंकाचे संपादक आनंद अवधानी या वेळी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, ‘‘देशात पुण्याइतके सांस्कृतिकदृष्टय़ा जिवंत असणारे शहर दुसरे नाही. एके काळी हा मान कोलकात्याचा होता. पुण्यात विविध क्षेत्रांतील जेवढे सार्वजनिक कार्यक्रम होतात तेवढे दिल्लीतही होत नाहीत. कमीत कमी शब्दांत दुसऱ्याचा जास्तीत जास्त अपमान फक्त पुणेकरच करू शकतात! इथले लोक सहजासहजी दाद देत नाहीत. पण एकदा दाद दिली की भरभरून देतात. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी रुजू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मला ज्येष्ठ नागरिकांची पत्रे येत. ‘तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमच इतके करता, मग विद्यापीठाचे काम कधी करता?’ असा प्रश्न त्या पत्रांत असे! परंतु मी काम करत असल्याची खात्री पटल्यावर ‘आम्ही तुमचा स्वीकार केला आहे,’ अशीही पत्रे पुणेकरांनी पाठवली होती!’’  पुण्यातील देवळांची विचित्र नावे आणि पुणेरी पाटय़ांच्या गमतीजमती द. मा. मिरासदार यांनी सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘पाऊशणे वर्षांपूर्वी मी पुण्यात आलो. त्या वेळचे पुणे टांग्यांचे आणि सायकलींचे होते. हे विद्यार्थ्यांचे आणि पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जात असे. आज पुण्याची ही वैशिष्टय़े उरली नाहीत. पूर्वी काय होते हे सांगावे लागेल, इतके पुणे बदलले आहे.’’
यंदाचा दिवाळी अंक आबेदा इनामदार यांना अर्पण करण्यात आला. ‘सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदल शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता उंचावल्यामुळेच घडू शकतील,’ असे इनामदार म्हणाल्या.  
निवडणूक लातूरमधूनच!
‘मी लोकसभेसाठी पुण्यातून उभे राहावे असा आग्रह धरला जात आहे. मात्र मला विचारल्यास मी लातूरमधून निडणूक लढवणे पसंत करीन. माझ्या आतापर्यंतची कारकीर्द पाहता मी अफगाणिस्तान, इथियोपिया अशा देशांसह महाराष्ट्राच्या दुष्काळी भागांमध्ये काम केले आहे. विकसित देश किंवा भागांपेक्षा अविकसित भागांना मी नेहमीच प्राधान्य दिले. या कारणास्तव माझा पर्याय लातूर असेल,’ अशा शब्दांत डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.