विश्वजित कदम यांचे छायाचित्र फ्लेक्सवर नसल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांचे छायाचित्र फ्लेक्सवर नसल्याचा निषेध करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री शशी थरुर यांच्या व्याख्यानाचा काँग्रेस भवनातील कार्यक्रम घोषणाबाजीने उधळून लावण्याचा प्रयत्न मंगळवारी केला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पक्षशिस्तीचे पालन करण्याचे आवाहन करूनही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी थांबली नाही. त्यामुळे ‘समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) प्रभावी वापर’ या विषयावरील थरुर यांचे व्याख्यानही त्यांना दहा-बारा मिनिटात गुंडाळावे लागले.

केरळ विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार संपवून पुण्यामध्ये आलेल्या शशी थरुर यांचे काँग्रेस भवन येथे कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यामध्ये ‘समाज माध्यमांचा प्रभावी वापर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. राज्य काँग्रेसचे सचिव शहेजाद पूनावाला आणि तेहसीन पूनावाला यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यासंदर्भात काँग्रेस भवन येथे लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर विश्वजित कदम यांचे छायाचित्र नसल्याचा राग व्यक्त करीत कदम यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फ्लेक्स फाडून टाकले होते. त्याचीच पुनरावृत्ती मंगळवारी पाहायला मिळाली. थरुर यांचे आगमन झाल्यापासून ते काँग्रेस भवन येथून ते जाईपर्यंत विश्वजित कदम यांच्या समर्थकांनी घोषणाबाजीने काँग्रेस भवन दणाणून सोडले होते.

थरुर यांचे आगमन होताच एका बाजूने ‘एकच वादा विश्वजितदादा’, ‘पुणे की जीत विश्वजित’ आणि ‘पुणे का नेता कैसा हो’ अशा घोषणा सुरू झाल्या. तर, थरुर यांच्या पाठीमागे असलेल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’ अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. शहजाद पूनावाला बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा कार्यकर्त्यांनी चक्क खुर्चीवर उभे राहून घोषणा देण्यास सुरूवात केली. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळून शांतता राखावी, असे आवाहन केले खरे; पण उलट घोषणांचा आवाज आणखी दणदणीत झाला. या गोंधळामध्ये थरुर यांनी केवळ दहा-बारा मिनिटांतच भाषण पूर्ण केले.

मनोगतानंतर थरुर यांनी कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारावेत, असे सांगितले. त्यामध्येही कदम यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला गेला. ‘विश्वजित यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. ते काही कामानिमित्त बाहेरगावी असून बुधवारी (१८ मे) मी त्यांची भेट घेणार आहे’, असे थरुर यांनी सांगितले. आमदार शरद रणपिसे, उपमहापौर मुकारी अलगुडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेता अरिवद शिंदे, तसेच बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई आणि गोपाळ तिवारी या वेळी उपस्थित होते. घोषणाबाजीच्या गोंधळानंतर कार्यकर्त्यांनी फ्लेक्सवरील पूनावाला बंधूंचे चेहरे विद्रूप केले.

‘काँग्रेस भवनामध्ये जमलेले सारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. केवळ माझ्याच नावाच्या नव्हे तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाच्याही घोषणा देत कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. काही कामानिमित्त मी दिल्ली येथे असल्याने कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाही हे मी थरुर यांना चार दिवसांपूर्वीच सांगितले होते. मी बुधवारी त्यांची भेट घेणार आहे’ असे विश्वजित कदम यांनी सांगितले. तर, काँग्रेस भवनामध्ये कोणताही गोंधळ झाला नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह होता, असे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले.

समाज माध्यमांच्या प्रभावी वापरामध्ये भाजप आघाडीवर

समाज माध्यमांचे महत्त्व ओळखून त्याचा प्रभावी वापर करण्यामध्ये भाजप आघाडीवर आहे. त्यांना सत्ता मिळवून देण्यामध्ये समाज माध्यमांचा मोठा वाटा असल्याचे शशी थरुर यांनी सांगितले. काँग्रेस पक्षामध्ये ट्विटरचा वापर करणारा मी पहिला नेता ठरलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपवाद वगळता दुसऱ्या स्थानावर माझाच क्रमांक आहे. माझ्यानंतर सुषमा स्वराज आहेत. समाज माध्यम हे जनतेशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम असल्याने त्याला वगळून चालणार नाही, असेही थरुर म्हणाले.