लोहगाव विमानतळावरून नव्या वर्षांत पुन्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणे शक्य

लोहगाव विमानतळाहून पुन्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.

पुणे : लोहगाव विमानतळाहून पुन्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षांत पुण्याहून दुबईसाठी उड्डाण सुरू करण्यास एका विमान कंपनीने तयारी दर्शवली आहे. तसेच पूर्वेकडील अन्य देशांत उड्डाणांसाठी विमान कंपन्यांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी बुधवारी दिली. तसेच विमानतळावर प्रवाशांची होणारी गर्दी, त्यामुळे करावा लागणारा गैरसोयींचा सामना, यावर मात करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांची संख्या वाढविणे, टर्मिनलमधील अधिकाधिक जागा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देणे आणि तपासणी कक्षांची संख्या वाढविणे आदी उपाययोजना प्राधान्याने करण्यात येणार आहेत.

विमानतळ सल्लागार समितीची शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीनंतर विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट आणि विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीत खासदार बापट यांनी विमानतळ प्रशासनाकडून उपाययोजनांची माहिती घेतली. टर्मिनल इमारतीमधील विमानतळ प्रशासनाची विविध कार्यालये स्थलांतरित करण्यात आली आहेत. ती जागा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांची गर्दी टळेल, हा त्यामागील उद्देश तसेच लोहगाव विमानतळावर सुरक्षेसाठी ‘सीआयएसएफ’चे ३२६ कर्मचारी तैनात केले आहेत. येत्या १ डिसेंबरपासून विमानतळावरून दिवस-रात्र प्रवासी सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार असून, सुरक्षेसाठी कर्मचारीही वाढवावे लागतील. हे गृहित धरून विमानतळ प्रशासनाने विमानतळ प्राधिकरणाकडे ‘सीआयएसएफ’च्या अतिरिक्त २०० जवानांची मागणी केली आहे. लोहगाव विमानतळासमोरील बहुमजली वाहनतळ जानेवारीत कार्यान्वित करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळेल तसेच लष्कराची साडेतेरा एकर जमीन विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे खासदार बापट यांनी सांगितले.

दरम्यान, लोहगाव टर्मिनलमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीसाठी आगमन आणि निगर्मनसाठी स्वतंत्र जागा आरक्षित आहे. मात्र, पुण्यातून सध्या एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण होत नाही. त्यामुळे ही जागा देशांतर्गत वाहतुकीसाठी वापरण्याची परवानगी लोहगाव विमानतळ प्रशासनाने विमानतळ प्राधिकरणाकडे केली आहे. ही जागा मिळाल्यास त्या ठिकाणी तपासणी कक्षांची संख्या वाढविणे शक्य होणार आहे, असे ढोके यांनी सांगितले.

  • टाळेबंदीत टर्मिनलमध्ये प्रति तास ७००-८०० प्रवासी येत-जात होते.
  • सध्या प्रति तास १५००-१८०० प्रवासी ये-जा करतात.
  • १ डिसेंबरनंतर दिवस-रात्र उड्डाणे सुरू झाल्यानंतर दिवसाला सरासरी १६० उड्डाणे होतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: International flights lohgaon airport new year ysh

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या