पुणे : डाव्या हाताने काम करणे हा दोष, शारीरिक व्यंग, अपशकून किंवा चुकीची सवय नसून, ती व्यक्तीच्या नैसर्गिक क्षमतेचा भाग आहे. मात्र, सामाजिक समजुती, अंधश्रद्धा आणि उजव्या हाताला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेली अनेक साधने यामुळे डावखुऱ्या व्यक्तींना आजही अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय डावखुरा दिनानिमित्त डावखुऱ्यांना ‘डावी वागणूक’ देण्याऐवजी समाजाने आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे मत डावखुऱ्या संघटनेने व्यक्त केले आहे.

आजचा दिवस (१३ ऑगस्ट) जगभरात डावखुरा दिवस म्हणून ओळखला जात आहे. १९७६ मध्ये अमेरिकेत प्रथम हा दिवस घोषित झाला, तर भारतात १९९१ सालापासून हा दिवस ओळखला जात आहे. जगभरात साधारण १० टक्के लोक डावखुरे आहेत. भारताच्या लोकसंख्येचा विचार केला, तर ही संख्या कोट्यवधींच्या घरात जाते. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी वापरली जाणारी अनेक दैनंदिन साधने मात्र उजव्या हाताच्या सोईने तयार केली जातात. लहानपणी वापरला जाणारा पेन्सिल शार्पनर, कात्री, प्रयोगशाळेतील उपकरणे, मोजमापाची साधने यामुळे डावखुऱ्यांना वेळ, अचूकता आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत अडचणी येतात. काही वेळा अपघाताचाही धोका निर्माण होतो, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

विशेषतः शाळकरी मुलांवर डाव्याऐवजी उजव्या हाताने लिहिण्याची किंवा काम करण्याची सक्ती केली जाते, असे नमूद करत संघटनेच्या मते काही ठिकाणी डाव्या हाताला बांधून ठेवण्यापर्यंतचे प्रकार घडतात. त्यामुळे मुलांमध्ये आपण काही तरी चुकीचे करत आहोत, असा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. ही सक्ती न करता मुलाला त्याच्या नैसर्गिक पद्धतीने काम करू द्यावे, असे लेफ्ट हॅन्डर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

डावखुरा असणे हे व्यंग नाही, तर यामागे वैद्यकीय कारणे आहेत, असे नमूद करत आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, ‘डावखुरेपणा हा मेंदूच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. डाव्या आणि उजव्या मेंदूच्या अर्धगोलांचे कार्य वेगवेगळे असून, शरीराच्या विरुद्ध बाजूंवर त्यांचे नियंत्रण असते. त्यामुळे एखादी व्यक्ती डावखुरी किंवा उजखुरी असणे ही नैसर्गिक बाब आहे.

डावखुऱ्यांच्या अडचणी

उजव्या हातासाठीच वस्तू — कात्री, टोकयंत्र, प्रयोगशाळेतील उपकरणे.
शाळेत सक्ती— डाव्या हाताऐवजी उजव्या हाताने लिहिण्याचा आग्रह.
मानसिक दबाव— डाव्या हाताला बांधून ठेवण्याचेही प्रकार.
वैद्यकीय क्षेत्रात अडथळे — काही उपकरणे डावखुऱ्यांसाठी गैरसोईची.
वेळ व अचूकतेचा प्रश्न — उपकरणे वापरताना अधिक वेळ लागू शकतो.
अंधश्रद्धेचा फटका — डाव्या हाताने जेवणे, पूजा करणे अशुभ मानण्याची धारणा.
मुलांवर बंधने नको— नैसर्गिक क्षमतेनुसार काम करू द्यावे.

असोसिएशन ऑफ लेफ्ट हँडर्स, इंडिया चे संस्थापक अध्यक्ष बिपिनचंद्र चौगुले चौगुले म्हणाले की,आपल्या समाजात डावा आणि उजवा हा भेद अनेक वर्षांनंतरही कायम आहे. अनेक डावखुऱ्या व्यक्तींनी विविध क्षेत्रांत मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे पालकांनी मुलाच्या हाताची निवड बदलण्यापेक्षा त्याला स्वच्छतेचे आणि आरोग्याचे संस्कार द्यावेत. ‘डाव्या हाताने करतोस, की उजव्या हाताने’ यापेक्षा ‘हात स्वच्छ ठेवतोस का’ हा प्रश्न महत्त्वाचा आहे,

डावखुरेपणाचा संबंध हा वैद्यकीय अंगाने घेतो याविषयी माहिती देताना जनरल फिजिशियन डॉ. राजकुमार शहा यांनी सांगितले की, डावखुरेपणा हा नैसर्गिक असून, त्याचा संबंध मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांच्या कार्यपद्धतीशी आहे. उजवा मेंदू शरीराच्या डाव्या बाजूवर, तर डावा मेंदू उजव्या बाजूवर नियंत्रण ठेवतो. काही व्यक्तींमध्ये उजवा मेंदू अधिक प्रभावी असल्याने त्या डावखुऱ्या असतात. त्यामुळे डावखुरेपणा हा दोष नसून, मेंदूच्या नैसर्गिक कार्यपद्धतीचा भाग आहे.

खेळाडूंना बराच वेळा डावखुरेपणाचा फायदा होतो असे नमूद करत आंतरराष्ट्रीय टेनिसपटू नितीन कीर्तने म्हणाले की, डावखुरेपणा हा खेळामध्ये खूप कामी येतो. टेनिस खेळत असताना डाव्या हाताने खेळ करत असताना त्याचा फायदा खूप होत आहे. त्यामुळे केवळ खेळाबद्दल बोलायचे असेल, तर डावखुरा असण्याचा मोठा फायदा आहे.