आयाम क्रिएशन्स, आशय फिल्म क्लब आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्यातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारपासून (७ मार्च) तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक वाङ्मयातील लेखिकांच्या अभिजात कादंबरीवर आधारित चित्रपट या महोत्सवात दाखविले जाणार आहेत.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे शुक्रवारी सायंकाळी चार वाजता प्रसिद्ध लेखिका सानिया यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, चित्रपट निर्मात्या अरुणा राजे, ‘धग’ चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली अभिनेत्री उषा जाधव, अभिनेते-निर्माते नितीश भारद्वाज या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमानंतर सुधा मूर्ती यांच्या कथेवर आधारित ‘पितृऋण’ हा चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती आयाम क्रिएशन्सच्या मनस्विनी प्रभुणे आणि नम्रता फडणीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. आशय फिल्म क्लबचे सचिव सतीश जकातदार आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे चित्रपट जतन अधिकारी किरण धिवार या वेळी उपस्थित होते.
अलीस वॉकर यांच्या ‘द कलर पर्पल’ , सिल्व्हिया नसार यांच्या ‘ए ब्युटिफुल माईंड’, हार्पर ली यांच्या ‘टू किल ए मॉकिंग बर्ड’, महाश्वेता देवी यांच्या ‘हजार चौरासी की माँ’ आणि झुम्पा लहरी यांच्या ‘द नेमसेक’ या कादंबरींवर आधारित चित्रपट या महोत्सवात दाखविले जाणार आहेत. शनिवारी (८ मार्च) फुलब्राईट संशोधन शिष्यवृत्तीविजेत्या चित्रपट अभ्यासक ईशा नियोगी यांचे ‘भारत-पाकिस्तान आणि बांग्लादेशमधील चित्रपट दिग्दर्शिका’ या विषयावर सकाळी दहा वाजता व्याख्यान होणार असून सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांच्या हस्ते टाईम्स ऑफ इंडियाच्या मेट्रो एडिटर मंजिरी दामले यांना ‘आयाम पत्रकारिता’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राजहंस प्रकाशनतर्फे ‘संपादित सानिया’ या सानिया यांच्या निवडक कथांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांच्या हस्ते रविवारी (९ मार्च) सायंकाळी चार वाजता होणार आहे. उत्तरार्धात रेखा इनामदार-साने आणि वंदना बोकील सानिया यांच्याशी संवाद साधणार आहेत.