नंदाताई बराटे यांचे आगळे-वेगळे पाळणाघर

पुणे : मध्यमवर्गीय घरांमध्ये मदतनीस हातांशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. रोज सकाळी आपल्या मदतीला धावून येणाऱ्या ताई, मावशी किंवा काकू अनेकदा त्यांच्या घरची चार कामे बाजूला ठेवून येतात. त्यांच्या लहानग्या लेकरांनाही घरी एकटं सोडून येतात. कष्टकरी हातांमागची ही वेदना २० वर्षांपूर्वी  ओळखून नंदाताई बराटे यांच्या ‘नंदादीप’ पाळणाघराची सुरूवात झाली. आज सुमारे दीडशे चिमुकल्यांना या पाळणाघराने मायेचा आसरा दिला आहे.

नंदाताई बराटे ६४ वर्षांच्या आहेत. १६ व्या वर्षी लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षांतच त्यांना वैधव्य आले. माहेरी येऊन त्यांनी अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले आणि कर्वे समाज सेवा संस्थेत १२ वर्ष नोकरी केली. भाऊ नानासाहेब बराटे यांच्या निवडणूक प्रचारासाठी कर्वे नगर परिसरात फिरत असताना एका झोपडीबाहेर चटईवर खेळणारं एकटं दीड वर्षांचं बाळ नजरेस पडल्यानंतर त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्या चिमुकल्याची आई धुण्या-भांडय़ांच्या कामासाठी गेल्याचे समजले. काळजीने त्या बाळाला घरी घेऊन आल्या आणि शेजारी आईसाठी निरोप ठेवला. बाळाला न्यायला आलेल्या आईला ‘उद्यापासून कामाला जाताना त्याला माझ्याकडे सोड’ हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. दुसऱ्यादिवशी त्या महिलेबरोबर आणखी दोन-तीन महिला आपल्या बाळाला नंदा ताईंकडे सोडून निर्धास्तपणे कामाला गेल्या, आणि नंदादीप पाळणाघर सुरू झाले.

नंदाताई सांगतात, सकाळी सहापासून धुणी-भांडी, स्वयंपाकाची कामे करण्यासाठी कष्टकरी महिला घर सोडतात. अनेक सोसायटय़ांमध्ये लहान मूल बरोबर आणलेले चालत नाही. तशी पाटीच लावलेली असते! या कुटुंबांमध्ये नवरा मिळवलेले पैसे दारुवर संपवून घरी येतो. त्या महिलेने काम केले नाही तर खायचे काय याची भ्रांत असते. या सगळ्या प्रश्नांवर उत्तर म्हणून मी हे पाळणाघर सुरू केले.

पाळणाघराबरोबरच बालवाडी सुरू केली. दरमहा अत्यल्प शुल्क आकारते. मदतनीस, शिक्षक आणि सेवक म्हणून १७ महिला माझ्याबरोबर काम करतात. त्यांनाही या निमित्ताने रोजगार मिळाला याचे समाधान वाटते. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच अशी या पाळणाघराची वेळ आहे, असेही त्यांनी सांगितले. या पाळणाघराचे स्वरूप बघून अनेक मध्यमर्वीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला आपल्या मुलांसाठीही स्वतंत्र पाळणाघर सुरू करा असा आग्रह करतात. त्यावर नंदा ताई म्हणतात, कष्टकरी महिलांच्या मुलांची सोय आणि निवारा हा या पाळणाघरामागचा हेतू आहे, अर्थार्जन करणे हा नाही. तळागाळातील सामाजिक गटांतील मुलं माझ्या पाळणाघरात आहेत, ती सगळी माझ्यासाठी सारखी आहेत. या मुलांच्या सहवासात मिळणारा आनंद, समाधान आणि त्यांचे प्रेम हीच माझी कमाई आहे.