व्यवसाय महिलांच्या सक्षम खांद्यांवर

पुणे : सोनं, चांदी आणि हिऱ्यांचा व्यापार म्हणजे तो जोखमीचाच!  पण हुशार, प्रामाणिक आणि कष्टाळू महिलांचे हात लागले तर काम कितीही जोखमीचं असो, ते सोपं आणि सुटसुटीत होऊन जातं, याचा अनुभव घेतल्यानंतर दागिने व्यापारातील अग्रणी असलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडने (पीएनजी सन्स) व्यवसायातील प्रमुख पदाची सूत्रं महिलांकडे सोपवली आहेत.

पुणे, मुंबईच नव्हे, तर चिंचवड, बदलापूर, नाशिक, उस्मानाबाद या राज्यांतील आठ शाखांमध्ये पीएनजीचा कारभार महिलांच्या सक्षम खांद्यांवर उभा आहे. पीएनजीच्या २९ शाखांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. त्यांपैकी किमान निम्म्या महिला आहेत. पीएनजी सन्सचे संचालक अध्यक्ष अजित गाडगीळ म्हणाले, दागिने व्यवसाय क्षेत्रात १८३२ पासून आम्ही महिलांना समान संधी देण्याबाबत आग्रही आहोत. आमच्याबरोबर काम करणाऱ्या महिलांची शैली, त्यांचा स्वभाव, नेतृत्वगुण यांबाबत सातत्याने निरीक्षण केल्यानंतर आम्ही महिलांकडे स्वतंत्रपणे दालनांचे व्यवस्थापन सोपवले. आमच्या सर्व महिला व्यवस्थापकांनी आमचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

संचालक डॉ. रेणू गाडगीळ म्हणाल्या, नेतृत्व गुण महिलांमध्ये असतातच, व्यवसाय-उद्योगाची गरज पाहून त्याला काही प्रमाणात दिशा देण्याची गरज भासते. दागिन्यांच्या क्षेत्रात महिलांचे व्यवस्थापन पाहण्यात नव्हते, म्हणून आम्ही हे आव्हान पेलायचे ठरवले. महिला अत्यंत चोखपणे जबाबदाऱ्या सांभाळतात. आमच्या सर्व महिला व्यवस्थापकांनी त्यांच्या कामातून हे सिद्ध केले आहे.

पीएनजी सन्सच्या हॅपी कॉलनी येथील शाखेच्या व्यवस्थापक मयुरी साळवी सांगतात, मी दहा वर्षे पीएनजी सन्समध्ये कार्यरत आहे. दागिने हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे महिला कर्मचारी असतील तर फरक पडतो. व्यवस्थापक म्हणून काम करताना पुरुष सहकारी आणि कुटुंबीय यांचा पाठिंबाही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. व्यवस्थापक म्हणून जबाबदारीसाठी निवड झाली तेव्हा मला दडपण होते, मात्र कंपनीने मला ही जबाबदारी घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. सहकार्य केले. औंध शाखेच्या व्यवस्थापक विनया परुळेकर सांगतात, ‘करीअर’ म्हणून पहायचे तर प्रत्येक क्षेत्रात जोखीम आहे. हे क्षेत्र त्याला अपवाद नाही. मात्र, दागिने व्यवसाय हा संपूर्ण ‘सिस्टिम’वर चालणारा आहे. तुमची व्यवस्था चोख असेल तर त्यातील जोखीम सोपी होते. ‘सीसीटीव्ही’सारख्या सुविधा काम सोपे करतात.