इयत्ता पाचवी ते एमए, यूपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन करणाऱ्या मेधा सिधये मराठीच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. मॉरिशस येथील तीन महिने वास्तव्यात तेथील बीएच्या विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन, तेथील ‘मराठी साहित्य सभां’मध्ये मराठी साहित्य आणि संस्कृती यांवर व्याख्याने, संपादन अशा जबाबदाऱ्या पेलून त्यांनी मराठीचा जागर केला. उद्याच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाटक, बालसाहित्य, संपादन अशा विविध कामांत मुशाफिरी करणाऱ्या मेधाताईंशी श्रीराम ओक यांनी साधलेला हा संवाद.

मराठीचा संस्कार कसा रुजला?

  • मुंबईतील विले-पार्ले या उपनगरात बालपणी आणि तरुण वयात वाचन, वक्तृत्व, मराठी नाटके, शास्त्रीय संगीत यांचे संस्कार झाले. पार्ले टिळक विद्यालय, पार्ले महाविद्यालय, लोकमान्य सेवा संघ या पार्ल्यातील संस्था म्हणजे अभिरुची, सुसंस्कार, नैतिक मूल्ये यांचे शिक्षण देणाऱ्या महत्त्वाच्या संस्था. ‘महाराष्ट्र सारस्वत’ हा वि. ल. भावे यांचा ग्रंथ मी दहावीत असतानाच वाचला. दहावीतच मराठीची ‘साहित्य विशारद’ ही परीक्षा उत्तीर्ण झाले. ही परीक्षा बीएच्या पातळीची होती. आमच्या घरात पुस्तकांचे कपाट होते. मोरपिशी रंगाची काचेची सुंदर मूठ असलेले चकचकीत पॉलिश असलेले ते कपाट म्हणजे माझ्यासाठी अलिबाबाची गुहा होती. मराठी, संस्कृत, इंग्रजी पुस्तकांनी भरलेले ते कपाट माझे आनंदनिधान होते.

भाषेची ही गोडी पुढे वाढली कशी?

  • माझ्या आजोबांच्या स्वतंत्र खोलीतील कपाटात ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, लोकमान्य टिळकांचे चरित्र आणि आठवणी असे ग्रंथ होते. तसेच, तेथे असणारे मराठी शब्दकोशांचे खंड ही माझ्यासाठी नवलाई होती. आजोबांना, वडिलांना नाटकांची आवड असल्यामुळे बिर्ला नाट्य मंदिर, मुंबई मराठी साहित्य संघ, विले-पार्लेतील खुल्या मैदानावरच्या नाट्यमहोत्सवात नाटके पाहायला मिळाली. पुलंचे ‘बटाट्याची चाळ’, ‘वाऱ्यावरची वरात’सारखे प्रयोग पाहायला मिळणे ही शालेय वयातील चैन होती. पुढे ‘एनसीपीए’त ‘आत्मकथा’ पाहिले.
  • लोकमान्य सेवा संघात ‘रंगायन’च्या ‘खुर्च्या,’ ‘एक शून्य बाजीराव’ पाहिले. तेजपाल ऑडिटोरियममध्ये ‘सखाराम बाइंडर’, ‘गिधाडे’ पाहायला मिळाले. पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, दत्ता भट, माधव वाटवे, व. दि. कुलकर्णी पार्ल्यातच राहणारे. पार्ल्यात नाट्यप्रयोगच नव्हे, तर नाट्यचर्चाही घडत. व्याख्यानमाला, चर्चासत्रे, अभिरूप न्यायसभा, पुढे उपनगर साहित्य संमेलन सगळे अनुभवता आले. मुंबई मराठी साहित्य संघात नानासाहेब फाटक यांची ‘एकच प्याला’तील ‘सुधाकर’ची भूमिका आणि केशवराव दाते यांची ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’मधील केशव शास्त्री ही भूमिका पाहायला मिळाली. हे सगळे भाग्ययोगच होते. यातूनच नाटकाच्या अभ्यासाची आवड निर्माण झाली.

नाट्यविषयक संपादित पुस्तकांची सुरुवात कशी झाली?

  • माझा प्रबंधाचा विषय होता ‘रंगभूमी नियतकालिकातील नाट्यसमीक्षा’. लहान वयात झालेल्या नाट्यसंस्कारांमुळे पुढे मी ‘नाट्य संमेलनाध्यक्षांची भाषणे-स्वातंत्र्योत्तर ते २०००’ आणि ‘नाट्यभाषिते -२००१ ते २०१९’ असे दोन खंड संपादित केले. माझ्या ‘मराठी नाट्यविचार विविध रूपे’ या ग्रंथात मी मराठीतील महत्त्वाच्या नाट्यग्रंथांवर स्वतःच्या टीका टिप्पणींसह विस्तृत विवेचन केले. या ग्रंथाला डॉ. अनंत देशमुख यांची प्रस्तावना लाभली. या ग्रंथातील लेख पहिल्यांदा ‘रंगवाचा’ या कणकवली येथून प्रसिद्ध होणाऱ्या नाट्यविषयक त्रैमासिकात प्रथम प्रसिद्ध झाले.

तुम्ही बालसाहित्यातही रमलात…

  • ‘घाटातले आभाळ’ आणि ‘रानपाखरं’ हे माझे दोन बालकवितासंग्रह प्रसिद्ध झाले. ‘घाटातले आभाळ’ या कवितासंग्रहाला बालकुमार साहित्य संमेलन संस्थेचा पुरस्कार मिळाला. मराठीतील काही महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये लेखन समाविष्ट झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड सात भाग चार’, ‘प्रा. श्री. के. क्षीरसागर गौरव ग्रंथ’, ‘स्त्री साहित्याचा मागोवा खंड दोन’, ‘मराठी समीक्षेचा पूर्वरंग’, ‘म. श्री. दीक्षित गौरव ग्रंथ’, ‘साप्ताहिक साधना खंड आठ’ अशा ग्रंथांमध्ये दीर्घ लेख समाविष्ट झाले.

साहित्यवैभव दिनदर्शिकेच्या संपादनाकडे कशा वळलात?

  • ज्येष्ठ साहित्यिक, चित्रकार ल. म. कडू यांच्या गमभन प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘साहित्यवैभव’ या दिनदर्शिकेचे संपादन मी २००३ पासून सातत्याने करते आहे. या दिनदर्शिकेसाठी लेखनदेखील केले आहे. त्यातील माझ्या लेखांचे ‘साहित्य नक्षत्रे’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकासह माझ्या ‘मराठी नाट्यविचार विविध रूपे’ या पुस्तकालाही ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’ची पारितोषिके मिळाली.
    shriram.oak@expressindia.com