उद्याच्या शाश्वत भविष्यासाठी चर खणून पाणी मुरवणाऱ्या, खड्डा खोदून झाड लावणाऱ्या जुन्नरच्या ‘पर्यावरणरक्षका’च्या कामाची दखल ‘मन की बात’मध्ये देशाचे पंतप्रधानही घेतात. त्या ‘वनरक्षक’ रमेश खरमाळे यांच्याशी ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी तुषार सूर्यवंशी यांनी साधलेला संवाद. ‘ऑक्सिजन पार्क’ उभारून, प्लास्टिक गोळा करून जीवसाखळीला मोकळा श्वास देण्याची धडपडही ते करत आहेत. पर्यावरण संवर्धनाबरोबर इतिहास संशोधन, जखमी प्राणी, पक्षी आणि सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात अडकलेल्या शेकडो पर्यटकांना सोडवण्यासाठी खरामळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
‘ऑक्सिजन पार्क’ची संकल्पना काय आणि गरज का वाटते ?
माणसाला झाडांपासून ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत झाडांची संख्याही वाढायला हवी. मात्र, आपल्या देशात माणसी केवळ २७-२८ झाडे आहेत. गरजेपेक्षा झाडांचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे पर्यावरणाचा समतोलही ढासळतो आहे. कधी नव्हे ते, जुन्नरचे तापमान ४२ अंशावर गेले. जागतिक तापमानवाढची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होते आहे. माणसासोबत झाडांच्या टिकण्यावरही त्याचा परिणाम होत आहे. आता माणसाला स्वतःचेच अस्तित्व टिकवायचे असेल, तर शेकडो वर्षे टिकणारी झाडे लावण्याशिवाय, ती जगवण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे वड, पिंपळ, मोहगणी, बकुळ, बांबू अशी देशी झाडे प्रत्येक दहा फुटावर विशिष्ट क्रमाने लावून मोठी खोडे असलेल्या झाडांचे ‘ऑक्सीजन पार्क’ उभारण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. मोठ्या खोडामुळे कितीही जोराचा वादळवारा आला, तरी एकही झाड पडणार नाही. वर्षानुवर्षे ती झाडे माणसाला ‘ऑक्सिजन’ देत राहतील. त्यांची मूळे माती धरून राहतील, पाणी मुरवतील. आतापर्यंत सुमारे २०० झाडे या ‘ऑक्सीजन पार्क’मध्ये लावली आहेत. असे ‘ऑक्सिजन पार्क’ सगळीकडेच असल्यावर माणसासोबत, निसर्गाचाही श्वास आपोआप मोकळा होईल.
वणवे पर्यायाने पर्यावरणाचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या ‘वणव्यां’चे प्रश्नावर कशा पद्धतीने काम करायला हवे ?
वणवे लागण्याची प्रकार आणि त्याची कारणे अनेक आहेत. मात्र, जोपर्यंत माणसाला वनांचे महत्त्व कळणार नाही, तोपर्यंत वनव्यांचा दाह कमी होणारा नाही. बऱ्याचदा स्थानिकांकडून कळत, नकळत वनवे लावले जातात. शेतकऱ्याकडून बांध साफ राहावा म्हणून पेटवलेल्या कचऱ्याची ठिणगी डोंगरापर्यंत जायला वेळ लागत नाही. माशांच्या पोळ्यातून मध काढण्यासाठी धूर केला जातो, जंगलातील लाकूड पेटवल्याने, हुरडा भाजण्यासाठी जाळ लावल्याने वनव्यांची शक्यता वाढते. डोंगर पेटवून दिला की, त्याची राख खाली वाहून येते आणि शेताला त्याचा मोठा फायदा होतो, अशा गैरसमजुतीतूनही वनवे लावण्याचे प्रकार नवीन नाहीत. वनव्यांच्या आगीमुळे कित्येक जीवाश्म नष्ट होतात. जंगलातली जैवविविधता धोक्यात येते. शेतात येणाऱ्या किडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाचे असणारे पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आणि वन्यजीवही त्यांचा अधिवास आणि जीवही त्या आगीमध्ये गमावून बसतात. शेतकऱ्यांचेही नुकसानच होते. हा धोका टाळायचा असेल, तर वणवे रोखण्यासाठी आवश्यक असलेली खबरदारी घेणे गरजेचे असते. वनविभागाकडून जाळपट्टे काढले जातात. त्यापुढे जात जुन्नरमध्ये मी आणि माझी पत्नी असे दोघेच जर १६-१६ किलोमीटरपर्यंत जाळपट्टे काढू शकतो तर, एक गाव मिळून जंगलांना वनव्यांपासून आणि कित्येक जिवांना धोक्यांपासून रोखू शकतो. स्थानिकांमध्ये वनांचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याची अधिक गरज आहे. त्यासाठी ‘वनरक्षकाने’ स्थानिकांचे प्रश्न समजून घेत त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करून स्थानिकांना वनसंवर्धनाच्या कामामध्ये सामील करून घ्यायला हवे.
वनांमध्येही भेडसावणाऱ्या ‘प्लास्टिक’ समस्येला कशाप्रकारे सामोरे जायला हवे ?
दीड महिन्यांपूर्वी ‘जुन्नर’मध्ये एक गाय मेली. त्या गायीच्या पोटात सुमारे ३०० किलो प्लॅस्टिक सापडले. शहरातल्या, गावातल्या लोकांकडून उरलेले खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बंद करून रस्त्याच्या कडेला टाकले जातात. त्या वाटेवरून जाणारी जनावरे ते खाण्यासाठी प्लास्टिकही चघळतात. सह्याद्रीच्या डोंगरावर भटकंतीसाठी, किल्ले पाहण्यासाठी येणारे पर्यटकही सोबतचे खाद्यपदार्थ ‘प्लास्टिक’च्या पिशवीतून, पाणी ‘प्लास्टिक’च्या बोटलमधून आणतात. त्या पिशव्या रानवाटांवर कुठेही टाकल्या जातात. त्यामुळे अनेक पक्षी, वन्यजीव धोक्यात आले आहेत. तेच टिकले नाहीत, तर जंगलेही समृद्ध होणार नाहीत. ‘प्लास्टिक’वर उपाय म्हणून शिवनेरी किल्ल्यावर उपवनसंवर्धकांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्लास्टिक बॉटल’ आणणाऱ्या पर्यटकांकडून पन्नास रुपये ठेव म्हणून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गडावरून माघारी जाताना ती प्लास्टिकची बॉटल दाखवल्यावरच पर्यटकाला त्याचे पन्नास रुपये माघारी दिले जातात. त्यामुळे एकतर प्लास्टिकची बॉटल गडावर आणली जात नाही, आणलीच तर ती इकडे तिकडे टाकली जात नाही. जुन्नरच्या प्रादेशिक वनविभागात पर्यटकांना माहिती देणाऱ्या ‘गाईड’ला वनसंवर्धनाचे, जैवविविधता आणि प्लास्टिकसारखे प्रश्न हाताळण्याचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारचे अनेक उपाय आता शोधावे लागतील, राबवावे लागतील. शेतकऱ्यांच्या बांधावर ‘मल्चिंग पेपर’च्या नावाखाली प्लास्टिक कुजलेले दिसते. त्याने जनावरांच्या, माणसांच्या जेवणातही ‘प्लास्टिक’चा न कळत प्रवेश होतो आहे. नजीकच्या काळात ही सर्वात मोठी समस्या समोर येते आहे.
खालावणाऱ्या भूजलाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न उभा राहतो आहे. त्यावर काय काम करायला हवे ?
दरवर्षी पावसाचे लाखो लिटर पाणी वाहून जाते. नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत. आता जलसंवर्धनासाठी मोठ्या संख्येने झाडे लावण्याची, ती जगवण्याची गरज आहे. झाडाची मूळे माती धरून ठेवतात, जमिनीत पाणी मुरवण्यासाठी मदत करतात. ‘चर खोदा, पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ ही मोहीम अधिक जोमाने राबवायला हवी. पत्नी सोबत मिळून दोन महिन्यांत ७० चर खणून जमिनीत आठ लाख लीटर पाणी केवळ दोन माणसे जिरवू शकतात, तर पाच हजार-हजार अशी लोकसंख्या असलेली गावे मिळून स्वतःची तहान तर भागवूच शकतात आणि लाखो, करोडो लिटर पाणी दर पावसाळ्यात जमिनीमध्ये मुरवू शकतात. प्रत्येकाने जागे होऊन, आत्मपरीक्षण करून जलसंवर्धनासाठी काम करण्याची गरज निर्माण झाली आहे, नाही तर आगामी काळात माणसाला पाण्यावाचून जीव सोडावा लागेल.