पिंपरी: शस्त्रविक्री प्रकरणात पकडलेल्या आरोपीकडे केलेल्या कसून चौकशी दरम्यान वर्षभरापूर्वी झालेल्या एका महिलेच्या खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी गुन्हे शाखेने चार आरोपींना गजाआड केले आहे. मोहंमद मोनिष इसरार अहमद शेख (वय-२४, रा. साईनाथ, देहूरोड), अब्दुल मुनाफ अन्सारी (वय-२४, रा. रूपीनगर, तळवडे), रईसउद्दीन राईन (वय-४०, रा. मोरेवस्ती, चिखली) आणि वासिब खान (रा. देहूगाव), या चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल बाबुराव खाणेकर उर्फ नूरजहा अजिज कुरेशी (रा. हरगुडे वस्ती, चिखली) या महिलेचा वर्षभरापूर्वी (५ ऑगस्ट) नियोजनबध्द खून करण्यात आला होता. जंगजंग पछाडूनही आरोपींचा छडा लागला नव्हता.  उत्तर प्रदेश व बिहार राज्यातून आलेले व चिखली, भोसरी औद्योगिक परिसरात राहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, शस्त्रविक्री प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत या खुनाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या पथकाने या प्रकरणातील चारही संशयित आरोपींना जेरबंद केले.

महिलेचा खून पाळत ठेवून

मयत महिला एकटीच राहत होती. ती जागेची खरेदीविक्री करते. तिच्याकडे भरपूर पैसे व दागिने आहेत, अशी माहिती आरोपींनी काढली होती. तिच्यावर पाळत ठेवून आरोपी ५ ऑगस्ट २०२१ ला रात्रीच्या वेळी घरात शिरले. महिलेचे हातपाय दोरीने बांधले. तोंडाला पट्टी बांधून तिचा गळा दाबून खून करण्यात आला. घरातील रोख रक्कम व अंगावरील सोन्याचे चोरून नेले, अशी कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investigation arms sales case reveals murder woman accused missing pune print news ysh
First published on: 04-07-2022 at 15:15 IST