पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाबरोबर पबमधील पार्टीत सामील झालेल्या १५ मुलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पार्टीत सामील झालेल्या मुलांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये जमा केले होते. उर्वरित ४८ हजारांचे बिल अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाने दिल्याची माहिती चौकशीत मिळाली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने २५ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले. १९ मे रोजी कल्याणीनगर भागात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर याप्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी अल्पवयीन मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणारे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल, आई शिवानी, आजोबा सुरेंद्र, तसेच ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, पबमध्ये मुलांना मद्य विक्री करणारे पबमालक, कर्मचाऱ्यांना अटक केली.

हेही वाचा – Pune Porsche Car Accident : “मृत तरुणांच्या रक्ताच्या नमुन्यांत…”, अनिल देशमुखांचा मोठा आरोप; म्हणाले, “माजी गृहमंत्री म्हणून…”

अपघातापूर्वी अल्पवयीन मुलगा पार्टी करण्यासाठी कोझी आणि ब्लॅक पबमध्ये गेला होता. तेथे अल्पवयीन मुलासह त्याचे मित्र होते. त्यांनी तेथे मद्यप्राशन केले. पार्टीत सामील झालेल्या १५ मुलांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पार्टीत सामील झालेल्या मुलांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये आणले होते. उर्वरित ४८ हजार रुपये अपघात करणाऱ्या मुलाने पबमध्ये जमा केल्याची माहिती चौकशीत मिळाली. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलण्यात आले.

ससूनमधील वैद्यकीय अधीक्षकांचा जबाब

ससूनमध्ये अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने बदलल्याप्रकरणी न्यायवैद्यक शास्त्र विभागातील कर्मचारी, तसेच परिचारिकांचे जबाब नोंदविण्यात आले. पोलिसांनी सहा ते सातजणांचे जबाब नोंदविले. ससूनमधील वैद्यकीय अधीक्षक यल्लप्पा जाधव यांचा बुधवारी जबाब नोंदवून घेण्यात आला.

हेही वाचा – पुण्यातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आयटी इंजिनियरने शोधला सोपा पर्याय

अश्लील रॅपसाँग प्रकरणात आर्यनची हजेरी

कल्याणीनगर अपघातानंतर अश्लील भाषेत रॅपसाँग समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आले होते. ही चित्रफीत अपघात करणाऱ्या मुलाने प्रसारित केल्याची अफवा पसरली होती. सायबर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केला. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या आर्यनने चित्रफीत केली होती. चित्रफीत शुभम शिंदे याने प्रसारित केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना नोटिसा बजाविल्या. आर्यन त्याच्या वकिलांमार्फत काही दिवसांपूर्वी पोलिसांसमोर हजर झाला. त्याचीही पोलिसांनी चौकशी केली.