डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मागील तीन वर्षांमध्ये राज्याच्या विविध भागात नोंदविलेल्या तक्रारींची पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे. त्यांच्या हत्येच्या तपासासाठी चार पथके राज्याच्या विविध भागात पाठविण्यात आली असून, डॉ. दाभोलकरांच्या कुटुंबीयांकडून माहिती घेण्याच्या दृष्टीने एक पथक साताऱ्याला रवाना झाले आहे. हत्येच्या घटनेशी संबंधित माहिती देण्याच्या दृष्टीने पोलिसांना आजवर ५० ते ६० लोकांनी दूरध्वनी केले असून, त्यांच्याकडून मिळालेली माहितीही पडताळून पाहिली जात आहे.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली. डॉ. दाभोलकर यांची मंगळवारी महर्षि शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेला तीन दिवस झाले असले, तरी पोलिसांच्या हातात अद्याप ठोस काही मिळालेले नाही. वेगवेगळ्या संघटना व संस्था, त्याचप्रमाणे त्यांचे प्रतिनिधी यांची चौकशी करण्यात येत आहे. डॉ. दाभोलकर यांच्या निकटवर्तीयांकडूनही माहिती घेतली जात आहे.
तपासाबाबत भामरे म्हणाले की, घटनेच्या परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण घेतले आहे. आणखी काही भागातील चित्रीकरण घेतले जात आहे. हल्लेखोर सकाळी सव्वासहालाच या परिसरात आले होते. पुलाच्या टोकाशी त्यांनी मोटारसायकल लावली. डॉ. दाभोलकर चालत पुलावर आले असता दोघे जण त्यांच्या मागे चालत गेले. सकाळी सव्वासातच्या सुमारास दोघांपैकी एकाने गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर शिंदेपाराच्या दिशेने मोटारसायकलवरून गेले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोपी दिसले आहेत. मात्र, चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. प्रत्यक्षदर्शींची माहिती व सीसीटीव्ही फूटेजमध्ये समानता आहे.
हल्लेखोरांनी वापरलेल्या मोटारसायकलबाबतही तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या अर्धवट क्रमांकावरून ४९ गाडय़ांची चौकशी करण्यात आली. मात्र त्यात काही निष्पन्न झाले नाही. या प्रकरणामध्ये तीन ते चार साक्षीदार आहेत. हल्लेखोर कोणत्या लॉजमध्ये राहिले होते, त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना कुणी पाहिले का, यासाठी लॉज व पंपांचीही तपासणी करण्यात येत आहे. सुमारे ५० ते ६० नागरिकांनी पोलिसांना दूरध्वनीवरून काही माहिती दिली आहे. त्याचीही पडताळणी करण्यात येत आहे. वेगवेगळ्या शक्यता गृहीत धरून तपास करण्यात येत आहे. राज्याच्या विविध भागात तपास पथके गेली आहेत. तपासाची व्याप्ती राज्यभर होऊ शकते. त्यामुळे डॉ. दाभोलकरांनी मागील तीन वर्षांत दाखल केलेल्या तक्रारींचीही तपासणी होत आहे.
डॉ. दाभोलकरांची डायरी पोलिसांना मिळाली
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची वैयक्तिक डायरी पोलिसांना मिळाली असून, त्याचा अभ्यास करण्यात येत असल्याचेही राजेंद्र भामरे यांनी सांगितले. डायरीत दैनंदिन नोंदी नसल्या, तरी त्यात असलेल्या सर्व नोंदींची तपासणी करण्यात येत आहे. त्यांचा कोणाशी वाद होता किंवा त्यांना काही धमकी मिळाली होती का, याबाबत माहिती घेतली जात आहे. कोणत्याही संघटनांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले नाही. संबंधित संघटनांकडूनही चौकशीत माहिती दिली जात आहे, असेही ते म्हणाले.