पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका भारतीय शेतमाल निर्यातीला बसला आहे. रमजानच्या महिन्यात इराणसह आखाती देशातून भारतातील फळे, कांद्याला मोठी मागणी असते. मात्र, निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झाले आहेत. नवी मुंबई येथील पं. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या (न्हावा शेवा) बंदरावर केळी, द्राक्षे, कांदा, तांदुळ यांचे ५०० ते ६०० कंटेनर माल निर्यातीसाठी उभे आहेत.

‘नवी मुंबईतील बंदरातून निघालेले जहाज इराणध्ये पोहोचण्यास सात ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. आतापर्यंत इराणसह अन्य आखाती देशात ५०० ते ६०० कंटेनर शेतमालाची निर्यात करण्यात आली आहे. मात्र, तेथे बंदरावर शेतमाल उतरवून घेण्यात येत नाही. बंदरावरील वीजपुरवठा, तसेच शीतगृहाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने शेतमाल खराब होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत भारतातील निर्यातदार आणि शेतकऱ्यांचे अंदाजे १२५ ते १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे’, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील श्री गुरुदत्त इम्पॅक्सचे संचालक, फळांचे आयात-निर्यातदार सत्यजित सुयोग झेंडे यांनी दिली.

‘बाजारात जुन्या, नव्या कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याची निर्यात जवळपास थांबली आहे. घाऊक बाजारात कांदा दरात घट झाली आहे’ असे मार्केट यार्डातील कांदा व्यपाारी राम नरवडे यांनी नमूद केले.

शेतमालाचे ५०० ते ६०० कंटेनर बंदरावर

इराण, तसेच अमेरिका, इस्त्राइलकडून क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहे. हल्ले-प्रतिहल्ल्यांमुळे इराणसह आखाती देशातील बाजारपेठा बंद आहेत. जल वाहतूक ठप्प झाली आहे. पं. जवाहरलाल नेहरू बंदरावर २५० ते ३०० कंटेनर केळी, १०० कंटेनर द्राक्षे, अन्य शेतमालाचे १०० ते २०० कंटेनर उभे आहेत.

आयातीवर परिणाम; इराणी सफरचंद महाग

इराणमधून सफरचंद, किवीची मोठी आवक होते. भारतात पाठविण्यात येणारे ८०० ते ९०० कंटेनर इराणमधील बंदरावर अडकल्याचा अंदाज आहे. २६ फेब्रुवारीपासून इराणमधून होणारी आवक ठप्प झाली आहे. इराणी सफरचंदाच्या दरात किलोमागे ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात एक किलो इराणी सफरचंदाचे दर १५० ते १६० रुपये आहेत. गेल्या आठवड्यात दहा किलो किवीचे दर १४०० ते १५०० रुपये होते. सध्या घाऊक बाजारात दहा किलो किवीचे दर १८०० ते १९०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

केळी, द्राक्ष, कांद्याची आखाती देशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. निर्यात थांबल्याने शेतमाल स्थानिक बाजाररपेठेत विकीस पाठविला जात आहे. परदेशातून होणारी फळांची आवक कमी झाली आहे. स्थानिक भागातून मार्केट यार्डात आवक वाढली आहे. आवक वाढल्याने फळांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली आहे. – बाळासाहेब कोंडे, फळे, भाजीपाला विभाग प्रमुख, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

युद्धामुळे इराणसह आखात देशात होणारी शेतमालाची आयात निर्यात ठप्प झाली आहे. व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे १२५ ते १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.- सत्यजित सुयोग झेंडे, श्री गुरुदत्त इम्पॅक्स, फळांचे आयात-निर्यातदार