पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे पुण्यात उच्च शिक्षणासाठी असलेले इराणी विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे युद्ध परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण संस्थांनी इराणी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना परदेशी विद्यार्थी प्रवेश घेतात.
सुमारे ८० देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. त्यात इराणमधील विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. इराणमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे पुण्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर दडपण आले आहे. या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय इराणमध्ये असल्याने कुटुंबाच्या सुरक्षिततेचीही त्यांना चिंता आहे. युद्ध किती काळ चालेल, या बाबत अनिश्चितता असल्याने विद्यार्थी तणावात आहेत.
या पार्श्वभूमीवर, विद्यापीठांनी इराणमधील विद्यार्थ्यांसह आखाती देशांतील विद्यार्थ्यांनाही मदतीचा हात दिला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे म्हणाले, ‘पुणे आणि परिसरात सुमारे १०० इराणी विद्यार्थी आहेत. त्यापैकी सुमारे २०हून अधिक विद्यार्थी विद्यापीठातील पीएचडी, भाषा अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत.
सध्या निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची बैठक घेण्यात आली. युद्ध परिस्थितीमुळे त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र, या स्थितीत विद्यार्थ्यांना आर्थिक सवलत दिली जाईल. आवश्यकतेनुसार समुपदेशन सुविधा पुरवण्यात येईल.
या पूर्वी २०२१मध्ये अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सत्तांतरावेळी अफगाणिस्तानातून आलेल्या विद्यार्थ्यांनाही विद्यापीठाकडून पूर्ण सहकार्य करण्यात आले होते.’‘सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात इराणमधील सहा, तर आखाती देशांतील ६०हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. युद्धस्थितीची शक्यता लागताच प्र कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांच्या पुढाकाराने इराणमधून आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याबाबत आश्वस्त करण्यात आले आहे.
विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय कक्ष विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शैक्षणिक, तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे,’ असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामकृष्णन् रमण यांनी सांगितले. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवीकुमार चिटणीस म्हणाले, ‘विद्यापीठात पाच इराणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
युद्ध परिस्थिती निर्माण झाल्यावर विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला असता विद्यार्थ्यांनी मानसिक तणाव असल्याचे सांगितले. मात्र, या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, गरजेनुसार आर्थिक सहाय्यही करण्यात येईल. त्या बाबत आंतरराष्ट्रीय विद्यार्थी विभाग काम करत आहे.’
