Temple Trails of the Dakshin: दक्षिण भारतातील प्रमुख मंदिरे, श्रद्धास्थाने, संस्कृती आणि पर्यटनाविषयी प्रत्यक्षात माहिती आणि अनुभव घेता यावा म्हणून ‘भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ’ (आयआरसीटीसी) यांच्यावतीने अध्यात्मिक दृष्टीने ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ या विशेष अध्यात्मिक आणि पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मनमाड स्थानकावरून १८ फेब्रुवारीपासून या सहलीला सुरुवात होणार असून रेल्वेकडून आरामदायी विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून श्रद्धा, संस्कृती आणि आरामदायी प्रवास यांचा संगम साधण्यासाठी दक्षिण यात्रा सहलीची माहिती सागण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग माहिती दिली.
डाॅ. सिंग म्हणाले, ‘दक्षिणेतील मुरुडेश्वर, गुरुवायूर, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, तिरुचिरापल्ली, कांचीपूरम व महाबलीपूरम ही स्थाने भारतातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थाने आहेत. तसेच काही जगविख्य़ात आणि ऐतिहासीक आणि पर्यटनाचे आकर्षक केंद्रबिंदू आहेत. भारतभरातून या ठिकाणी भाविक, पर्यटकांची या ठिकाणांसाठी पसंती असते. त्या पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीने मध्य रेल्वेच्या सहकार्याने ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ या विशेष सहल-यात्रेसाठी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.’
अनेकदा पर्यटक, भाविक या ठिकाणी गेल्यानंतर राहणे, खानपानच्या गैरसुविधेला सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर पर्यटक आणि भाविकांना सुलभ सेवा मिळावी, प्रमुख स्थळांवर पर्यटन, धार्मिक ठिकाणांचे दर्शन आणि सखोल माहिती मिळावी या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. जवळपास १३ दिवसांची सहल असून इच्छूकांना मनमाड, नाशिक रोड, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा आणि मिरज या स्थानकांवरून प्रवास सुरू करता येणार आहे. गाडीत वातानुकुलीत, आरामदायी, अतीमहत्वाची श्रेणी असलेले डबे असणार असून ७५० प्रवाशांची क्षमता असणार आहे, असे डाॅ. सिंग यांनी सांगितले.
तसेच प्रवाशांचे आरोग्य, सुरक्षितता व सोयीसाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली असून प्रेक्षणीय स्थळा्ंची, मंदिरांची माहिती सांगण्यासाठी पर्यटक मार्गदर्शक (टुरीस्ट गाईड) आणि सुरक्षिततेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही डाॅ. सिंग यांनी नमूद केले.
तिकटाचे दर
या सहलीसाठी ‘इकॉनॉमी’ श्रेणीतील डब्यासाठी प्रतिव्यक्ती २३,३७०, ‘स्टँडर्ड ३ टायर’ डब्यासाठी ३६,९९० आणि ‘कम्फर्ट २ टायर’ डब्यासाठी ४८,७६० रुपये असे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. आगाऊ आरक्षण सुविधा ऑनलाईन सुरू करण्यात आली असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाचा वापर करावा. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी ८२८७९३१८८६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी डाॅ. सिंग यांनी केले.
आयआरसीटीसीतर्फे रेल्वे प्रवाशांना मुरुडेश्वर, गुरुवायूर, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, तिरुचिरापल्ली, कांचीपूरम व महाबलीपूरम या दक्षिण भारतातील महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यासाठी ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ या अध्यात्मिक-पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.- गौरव झा, महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी, मुंबई</strong>
