पुणे : रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण करताना अनावश्यक पॉपअप्स, कॅप्चा आणि लांबणाऱ्या प्रक्रियेमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. आा मात्र हा त्रास कमी करण्यासाठी रेल्वेकडून आयआरटीसीच्या तिकिट बुकिंग सुविधेत महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत.
तिकीट बुकिंग अधिक सोपे आणि सुरक्षित व्हावे म्हणून आयआरटीसीच्या संकेतस्थळाचे सुधारित बीटा व्हर्जन तयार करण्यात आले आहे. हे नवे संकेतस्थळ लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
नुकतीच जयपूर येथील मालविय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थ्यांनी आयआरटीच्या संकेतस्थाळावरील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानंतर रेल्वेकडून संकेतस्थळ सुधारासाठी पाऊले उचलण्यात आली. रेल्वेने १५ जुलैपर्यंत आयआरटीसीचे संकेतस्थळ सुधारण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी जयपूर येथे आयआरटीसी आणि रेल्वे सूचना प्रणाली केंद्राच्या (सीआयआरएस) अधिकाऱ्यांनी मालविय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसमोर आयआरटीसीच्या संकेतस्थळाचे नवीन बीटा आवृत्ती सादर करून त्यांचा अभिप्राय मागवला.
नव्या संकेतस्थळात काय बदलणार ?
नवीन बीटा आवृत्तीत प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. तिकीट बुक करताना संकेतस्थळावर येणारा अनावश्यक कॅप्चा, पॉपअप्स, ग्राफिक्स आदी घटक काढून टाकण्यात आले आहेत. तसेच नव्या संकेतस्थळावर सर्व वर्गांमधील जागांची उपलब्धता एकाच स्क्रीनवर दिसणार आहे. तिकीट बुक करण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या कमी करण्यात आल्याने प्रवाशांना जलद बुकिंग करता येणार आहे. वारंवार तिकीट बुक करणाऱ्यांना प्रवाशांना एकदाच माहिती भरावी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा त्रास कमी होणार आहे.
आरक्षण यंत्रणा बदलणार
सध्या हे नवे संकेतस्थळ रेल्वेच्या चार दशक जुन्या Passenger Reservation Engine या यंत्रणेशी जोडण्याचे काम सुरू आहे. ही आरक्षण यंत्रणाही समांतरपणे पूर्णपणे बदलली जात आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने चालणारे नवीन IRCTC पोर्टल काही महिन्यांतच लाँच होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, रेल्वेच्या RailOne या ॲपने चार कोटी डाउनलोडचा टप्पा ओलांडला असून, ते आता देशातील सर्वात मोठे रेल्वे तिकीट बुकिंग ॲप बनले आहे. या अॅपवर तत्काळ बुकिंगमध्ये बॉट्स रोखण्यासाठीही रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. हे सगळे बदल मालविय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या केलेल्या सूचनांमुळेच शक्य झाल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
