देशभरातील दहा ते बारा राज्यांमध्ये आयसीस या दहशतवादी संघटनेचा प्रभाव वाढत असून, त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही तरुण या संघटनेकडे आकर्षित झाले असल्याची कबुली राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विवेक फणसळकर यांनी दिली. संबंधित तरुणांना दहशतवाद्यांपासून परावृत्त करण्यासाठी एटीएसने व्यापक प्रमाणावर प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटीएसचे संकेतस्थळ सुरू करणार आहे, असेही फणसळकर यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर आयसीसचे हस्तक घातपाती कारवाया करण्याची तयारी करत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्या अनुशंगाने देशभरातील तपास यंत्रणांनी कारवाई करून आयसीसशी संबंधित असलेल्या सोळाजणांना अटक केली आहे. यामध्ये मुंब्रा, माझगाव परिसरातील तरुण आहेत. या पाश्र्वभूमीवर फणसळकर यांनी रविवारी एटीएसच्या पुणे कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
फणसळकर म्हणाले, आयसीसच्या प्रभावाखाली देशभरातील दहा ते बारा राज्य आहेत. त्यापैकी महाराष्ट्र एक आहे. इंटरनेट, फेसबुक या माध्यमातून काही तरुण मूलतत्त्ववाद्यांच्या प्रभावाखाली येत आहेत. त्यांना त्यापासून परावृत्त करण्याची जबाबदारी एटीएसवर आहे. तसेच काहीजण आयसीसमध्ये सामील होण्यासाठी बेपत्ता होत आहेत. त्यांच्याही मागावर आम्ही आहोत.
आयसीसच्या प्रभावाखाली येणाऱ्या तरुणांचे प्रबोधन आणि त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी एटीएस सातत्याने प्रयत्न करीत आहे. मुस्लीम समाजातील मौलवींशी आम्ही संपर्कात आहोत. त्या अनुशंगाने राज्यभरात बैठका घेतल्या आहेत. मुस्लीम समाजातील बहुतांश लोक हे आयसीसच्या विरोधात आहेत. आयसीसच्या प्रभावाखाली जे तरुण आले आहेत, हे वाट चुकलेले आहेत. या तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी एटीएस सातत्याने प्रयत्न करीत आहे. मुस्लीम समाजानेही या कामासाठी पाठींबा दर्शविलेला आहे.
आयसीसशी संबंधित ९४ संकेतस्थळे बंद
आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेली ९४ संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत. या संकेतस्थळावर तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रलोभने दाखविण्यात येत होती. देशभरातील तपास यंत्रणांनी अशा संशयीत संकेतस्थळांची यादी तयार करून ती केंद्र शासनाकडे पाठवली होती व ती बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत तसेच राज्य एटीएस लवकरच स्वत:चे संकेतस्थळ सुरू करणार आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांची कार्यपद्धती तसेच दहशतवाद्यांकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांचे प्रबोधन करण्यात येणार आहे, अशी माहिती एटीएस प्रमुख विवेक फणसळकर यांनी दिली.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onआयसिसISIS
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isis maharashtra influence
First published on: 25-01-2016 at 02:32 IST