पुणे : राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एसएसडीसी) माध्यमातून आता  देशातील नागरिकांना इस्रायलमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यात आता महाराष्ट्राच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारकडून इस्रायल सरकारच्या सहकार्याने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

इस्रायलमध्ये प्रामुख्याने घरगुती मदतनीस म्हणजेच ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पात्र व प्रशिक्षित भारतीय उमेदवारांना यामध्ये संधी मिळणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ४५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान आवश्यक आहे.

याशिवाय केअरगिव्हर किंवा परिचर्या संबंधित प्रशिक्षण (जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग) असणे आवश्यक आहे. उमेदवाराने यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. तसेच उमेदवाराचा जोडीदार, पालक किंवा मुले सध्या इस्रायलमध्ये कार्यरत नसावेत किंवा तेथील रहिवासी नसावेत. उमेदवाराकडे किमान तीन वर्षे वैध पारपत्र असणे आवश्यक आहे. या निवडीचा अंतिम अधिकार इस्रायलमधील नियोक्त्यांना असणार आहे.

या भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती https://maharashtrainternational.com⁠  या संकेतस्थळावरील ‘लेटेस्ट जॉब्स’ या विभागात उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन या रोजगार संधीची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सु.रा. वराडे यांनी केले आहे.

इस्रायलमधील नोकरीची संधी

घरगुती केअरगिव्हर

एकूण नोकऱ्या – ३५००

वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे

लिंगनिहाय प्रमाण – महिला ९० टक्के, पुरूष १० टक्के

उंची – १.५ मीटर अथवा त्यापेक्षा अधिक

वजन – किमान ४५ किलो अथवा त्यापेक्षा अधिक

वेतन – दरमहा १ लाख ९९ हजार ७७० रुपये

कामे कोणती?

अपंग व्यक्ती, वृद्ध व्यक्तींची प्रामुख्याने काळजी घेणे. त्यात दैनंदिन घरगुती कामांचा समावेश आहे. संबंधित व्यक्तींना अंघोळ घालणे, कपडे घालणे, शौचालय सहाय्य, डायपर बदलणे, स्वयंपाक करणे, खाण्यास मदत, औषधे देणे, देखरेख करणे, हालचालीस मदत करणे, घर स्वच्छ ठेवणे, खरेदी, धुलाई, दैनंदिन साहित्य खरेदी, घराबाहेर सोबत देणे आणि इतर आवश्यक कामांचा समावेश आहे.