पुणे : ‘आपला देश आता विकसनशील राष्ट्र राहिलेला नाही. आपण देश म्हणून एका विशिष्ट ठिकाणी पोहोचलो आहोत. आपला देश आता विकसित राष्ट्र म्हणून ओळखला जात आहे. आर्थिक महासत्ता म्हणून आपण उदयाला येत आहोत. मात्र, आपला देश तंत्रज्ञानातील महासत्ता आहे का, या प्रश्नाचे उत्तर आजही नाही, असेच द्यावे लागते,’ अशी खंत ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

‘आपला देश एक शक्तिशाली राष्ट्र, आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी अनेक आघाड्यांवर प्रयत्न करावे लागतील. तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण व्हावे लागेल. आता आपण त्या मार्गावर आहोत,’ असेही सोमनाथ यांनी नमूद केले.

‘भारत-भारती’च्या वतीने आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात सोमनाथ बोलत होते. स्वामी शांतिस्वरूपानंद, भारत-भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुबासिंग धवन, कार्याध्यक्ष विनय पत्राळे, सचिव रुद्रनारायण तिवारी, प्रदेशाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महानगरप्रमुख अचल जैन या वेळी उपस्थित होते.

डॉ. एस. सोमनाथ म्हणाले, ‘आपल्या देशात एक मोठी बाजारपेठ आहे. आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राष्ट्रांपैकी एक आहोत. यात सुविधा असलेले आणि सुविधा नसलेले दोन्ही प्रकारचे नागरिक आहेत. आपण सगळ्यांनी ठरवले, तर राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतो. पंतप्रधानांनी दिलेले ‘डिझाईन इन इंडिया’, ‘डेव्हलप इन इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर इंडिया’चे लक्ष्य साध्य करण्यासाठी संशोधन आणि तंत्रज्ञानात, एआय-बायोटेकमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची गरज आहे.’

‘अंतराळात जाण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये गुंतवणूक करावी. विद्यापीठांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता देशातील विद्यापीठांतले ज्ञान उच्च दर्जाचे आहे. मात्र, संशोधनात आपण खूप मागे आहोत. आपल्याला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे. त्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी दिलेल्या वारशावर विश्वास ठेवून मार्गक्रमण करावे लागेल,’ असेही सोमनाथ यांनी सांगितले.

‘ज्ञानाचा उद्देश धन कमावणे नव्हता’

डॉ. एस. सोमनाथ म्हणाले, ‘भारतीय संस्कृती ही विज्ञानाला अध्यात्माच्या शोधप्रक्रियेपासून वेगळे समजत नाही. आपण भारतीय कायमच ज्ञानाच्या शोधात राहिलो आहोत. अनंताबद्दलही आपल्या संस्कृतीत खूप खोलवर चर्चा झाली आहे. आपल्या संस्कृतीत विचारले जाणारे मूलभूत प्रश्न हे इतर संस्कृतींपेक्षा निराळे आहेत. भारतीय परंपरा, संस्कृती ही सृष्टीच्या अस्तित्वाविषयी अत्यंत जागरूक आहे.’

‘आर्यभट्टाने दुर्बिणीशिवाय ग्रहांच्या गतीबद्दल सांगितले. ब्रह्मगुप्ताने शून्याचा शोध लावला, दशमान पद्धत दिली. सुश्रुताने स्कॅनिंगशिवाय शस्त्रक्रिया केल्या. पाणिनीने जगातील पहिले व्याकरण लिहिले. त्या काळात कोणतीही साधने नसताना आपण गणितात, औषध-विज्ञानात पुढे होतो. पण आज काय झाले? हा गंभीर प्रश्न आहे. जे ज्ञान त्या वेळी अग्रगण्य होते, ते वाढले नाही. कारण, आपल्याकडे ज्ञानाला शक्ती नाही, साधना मानले गेले. ते पवित्र मानून स्तोत्रे आणि शास्त्रांमध्ये जतन केले. तेही फार कमी लोकांना समजत होते. आता ज्ञानाला मोठी किंमत आहे. मात्र, आपल्याकडे त्याचे व्यावसायिकरण केले गेले नाही. ज्ञानाचा उद्देश कधीही धन कमावणे नव्हता. आपल्याकडचे ज्ञान म्हणजे मनुष्याचा उद्धार, समाजाचा विकास आणि निसर्गासोबतचे संतुलित जीवन होते,’ असेही सोमनाथ यांनी सांगितले.