पुणे : बड्या आयटी कंपन्यांकडून महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरी दिल्या जातात. विद्यार्थी तसेच मिळणाऱ्या भलामोठ्या ऑफरचे सगळ्यांनाच कौतुक असते. अशा कॅम्पसमधील ऑफरच्या जाहिराती महाविद्यालय जोरात करतात. मात्र आता आयटी क्षेत्रातील मंदीच्या वाऱ्यामुळे कॅम्पसमध्ये नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना आयटी कंपन्या प्रत्यक्षात रुजू करून घेत नसल्याचे चित्र समोर आले आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या देशातील आघाडीच्या आयटी कंपनीने अनेक विद्यार्थ्यांनी तोंडाला याप्रकारे पाने पुसली आहेत.
आयटी क्षेत्रात कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीचे आश्वासन देऊन महिनोनमहिने प्रत्यक्ष रुजू करून न घेण्याच्या तक्रारी वाढत असून, अशाच प्रकारची गंभीर बाब समोर आली आहे. फोरम फोर आयटी एम्प्लॉईज संघटनेकडे दररोज अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत. विशेषतः एका बड्या आयटी कंपनीकडून मार्च २०२५ मध्ये निवड झालेल्या अनेक संगणक अभियंत्यांना अजूनही रुजू होण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याची बाब समोर आली आहे.
फोरमच्या म्हणण्यानुसार, अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची मार्च २०२५ मध्ये कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत निवड झाली होती. निवड झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना ऑफर लेटरही देण्यात आले. मात्र त्यानंतर जवळपास वर्षभर उलटून गेले तरीही कंपनीकडून प्रत्यक्ष नोकरीवर रुजू करून घेण्याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. अनेक विद्यार्थ्यांनी वारंवार कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ठोस उत्तर मिळाले नसल्याची तक्रार आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
या परिस्थितीमुळे नुकतेच पदवीधर झालेले तरुण मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी ऑफर लेटर मिळाल्यानंतर इतर नोकरीच्या संधी नाकारल्या. काहींनी पुढील शिक्षणाचा निर्णयही पुढे ढकलला. परिणामी जवळपास वर्षभर करिअर ठप्प झाल्याची भावना या तरुणांमध्ये निर्माण झाली आहे. काही विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवरही याचा आर्थिक व मानसिक ताण येत असल्याचे सांगितले जात आहे. फोरमने या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कॅम्पस भरती करताना कंपन्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली आश्वासने पाळणे ही त्यांची नैतिक जबाबदारी असल्याचे संघटनेचे मत आहे. मोठ्या आयटी कंपन्यांनी अशा प्रकारे तरुण अभियंत्यांना प्रतीक्षेत ठेवणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचेही फोरमने म्हटले आहे.
आयटी क्षेत्रावरील विश्वास डळमळीत
याबाबत फोरमने आयटी संबंधित कंपनीकडे तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना रुजू करून घेण्याबाबत वेळापत्रक जाहीर करावे, तसेच इतक्या काळ अनिश्चिततेत ठेवलेल्या विद्यार्थ्यांना योग्य तो दिलासा द्यावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे. आयटी क्षेत्रात अलिकडील काळात भरती प्रक्रियेत मंदी, प्रकल्पांमधील अनिश्चितता आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम दिसून येत असला, तरी कंपन्यांनी भरती प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अन्यथा अशा घटनांमुळे तरुण अभियंत्यांचा आयटी क्षेत्रावरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
