It raided companies ajit pawar relatives NCP leaders take to the streets abn 97 kjp 91 | We Support Ajit Dada म्हणत राष्ट्रवादीचे नेते उतरले रस्त्यावर; काळ्या फिती बांधून केला केंद्राचा निषेध! | Loksatta

We Support Ajit Dada म्हणत राष्ट्रवादीचे नेते उतरले रस्त्यावर; काळ्या फिती बांधून केला केंद्राचा निषेध!

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली असून अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे

We Support Ajit Dada म्हणत राष्ट्रवादीचे नेते उतरले रस्त्यावर; काळ्या फिती बांधून केला केंद्राचा निषेध!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. त्यानंतर केवळ माझे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांच्या संस्थांवर छापे टाकले असतील, तर कोणत्या स्तरावर जाऊन राजकारण केले जात आहे, वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर केला जात आहे, याचा आता जनतेनेच विचार करावा, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली होती. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येत अजित पवार यांच्या समर्थनात जोरदार घोषणबाजी केली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी We Support Ajit Dada असे फलक हातात घेऊन केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह इतर स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. ही कारवाई म्हणजे सूडबुद्धीने केलेले राजकारण आहे अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या विकास झाल्याचं अनेकदा बोललं जातं. गुरुवारी अजित पवार यांचे नातेवाईक, निकटवर्तीय आणि मुलगा पार्थ पवार यांच्या घरावर, कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले असून या छाप्यांच्या विरोधात पिंपरीतील स्थानिक नेते रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी भाजपाचा निषेध करत पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी भाजपा आणि केंद्राच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून कारवाईचा निषेध नोंदवला. आंदोलनावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी आमची ताकद, आमचा अभिमान, अजित दादा आमची शान अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. तसेच, We Support Ajit Pawar अस म्हणत त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या छाप्यानंतर राष्ट्रवादी चे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-10-2021 at 14:05 IST
Next Story
…अन् अजित पवार धरणाच्या पाण्यात मधोमध अडकले!