पुणे : हिंजवडी आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांसाठी हिंजवडी ते मुंबई बस सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. परिवहन विभागाकडून प्रस्तावाला मान्यता मिळताच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

शहरातील आयटी हब असलेल्या हिंजवडी येथे महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून कर्मचारी येतात. शनिवार, रविवार किंवा कार्यालयीन सुट्टीच्या कालावधीमध्ये अनेक आयटी कर्मचारी मूळ गावी जात असतात. पुण्यातील वाहतूक कोंडीमुळे उपनगरांपासून स्वारगेट, शिवाजीनगर या स्थानकांपर्यंत जाण्यास खूप वेळ लागतो. तसेच, स्थानकांपासून हिंजवडी परिसरात पोहोचण्यासाठीही वेळ लागतो.

सध्या स्वारगेट, शिवाजीनगर स्थानकावरून दिवसभरातून १२४ फेऱ्या दादर, बोरिवली, ठाणे या मार्गावर होत आहेत. त्यामध्ये ई-शिवनेरी व ई-शिवाई या वातानुकूलित ई-बस आहेत. मात्र, वाहतूक कोंडीमुळे नियोजित वेळेपेक्षा एक ते दीड तास उशिराने बस स्थानकावर पोहोचत आहेत. तसेच, वाकड चौकापासून स्वारगेट व पुणे स्टेशनपर्यंत वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी प्रवासी व प्रवासी संघटनांकडून हिंजवडी येथूनच एसटीच्या काही फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.

या मागणीची दखल घेऊन एसटी प्रशासनाने हिंजवडी परिसरातून थेट मुंबईसाठी एसटी सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. याबाबत परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हिंजवडीतील विस्तार आणि स्थानिक पातळीवरील नागरिकांची आणि आयटी कर्मचाऱ्यांची वाढती मागणी पाहता हिंजवडी ते मुंबई या मार्गावर स्वतंत्र बस सेवा सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविण्यात आला असून, मंजुरी मिळताच तातडीने सेवा सुरू करण्यात येईल. – अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे