निगडी प्राधिकरण परिसरात ७६ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून चोरट्याने धमकी देत मारहाण करून ४ लाखांपेक्षा अधिक किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या प्रकरणी निगडी पोलिसांनी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. संबंधित चोरी त्यांनेच केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, इथून पुढे दरोडे आणि चोरी करण्याचे आरोपींनी ठरवले होते, तशी हत्यारेही ते विकत घेणार होते, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

दीपक उर्फ दिप्या अंकुश सुगावे (वय २०, रा. तळेगाव दाभाडे, मूळ नांदेड), संदीप ऊर्फ गुरू भगवान हांडे (वय २४, रा. चिंचवड मूळ – औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना केअर टेकरचे काम देण्याच्या बहाण्याने बोलावून निगडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, ७६ वर्षीय हेमलता पाटील या फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. जून महिन्यात त्यांच्या पतीचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पतीची देखभाल करण्यासाठी तेव्हा केअर टेकर म्हणून आरोपी दीपक तीन दिवसांसाठी आला होता. घरात हे दोघे असल्याने घरातील प्रत्येक कानाकोपऱ्याची माहिती घेऊन गेल्या आठवड्यात चाकूचा धाक दाखवून वृद्ध हेमलता यांना मारहाण करत त्याने घरातील ४ लाखांचा सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी पोलीस तपासात केअर टेकरचं आरोपी असल्याची शक्यता लक्षात घेता दीपकला केअर टेकरचं काम देण्याच्या बहाण्याने पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं. आरोपीकडून १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

केअर टेकरचं काम देण्यापूर्वी पडताळणी करावी

जेष्ठ नागरिकांनी घरी केअर टेकर ठेवताना किंवा कोणत्याही घर कामासाठी कामगार ठेवत असताना त्यांची पोलिसांमार्फत पडताळणी करावी आणि संबंधित कामगारांचा सध्याचा, मूळ पत्ता, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड, पॅनकार्डचे झेरॉक्स घेवून ठेवाव्यात व घर कामगारांची योग्य खात्री करूनच त्यांना कामावर ठेवावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी केले आहे.