पुणे : तमाशासाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ‘इठा’ चित्रपटाच्या टीझरमध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप विठाबाईं नारायणगावकर यांचे नातू आणि राज्य सरकारच्या ज्येष्ठ कलाकार अनुदान समितीचे सदस्य धनंजय खुडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. विठाबाईंचे नातेवाईक या वेळी उपस्थित होते.
खुडे म्हणाले,‘विठाबाई नारायणगांवकर यांनी महाराष्ट्राच्या लोककलांना जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांचे जीवन, संघर्ष आणि कलाप्रवास हा राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या जीवनावर आधारित कोणत्याही चित्रपटात ऐतिहासिक सत्यता, कुटुंबीयांच्या भावना आणि सामाजिक जबाबदारी यांचा आदर राखला जाणे गरजेचे आहे.
मात्र, ‘इठा’ चित्रपटात चुकीची माहिती दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात भाऊ गावकर तमाशा मंडळ केलेला उल्लेख चुकीचा आहे. या मंडळाचे नाव ‘भाऊ बापू (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ’ असे आहे. विठाबाई नारायणगावकर यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. हा प्रसंगही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे.’
‘विठाबाईंच्या जीवनावर आधारलेला ‘इठा’ चित्रपट सत्यकथा असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र चित्रपटाला ‘इठा’ हे नाव का दिले, हा प्रश्न आहे. विठाबाईंनी तमाशाला घराघरापर्यंत पोहचवण्याचे काम केले आहे. त्यांचा जन्म कधी झाला, त्यांनी रंगमंचावार कधी पाऊल ठेवले इत्यादी गोष्टी महत्वाच्या आहेत. मात्र, त्या चित्रपटात दाखविण्यात आल्या नाहीत.
विठाबाईंच्या जीवनावर आधारलेला चित्रपट असेल, तर या गोष्टी दाखवायला हव्या होत्या. या चित्रपटात विठाबाईंचा खरा इतिहास सांगितला नाही. त्यामुळे चित्रपटाला विरोध आहे. विठाबाईंना आठ मुले होती. मात्र, चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक त्यातील एकालाही भेटले नाहीत. विठाबाईंच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी कुटुंबियांची परवानगी घेतली नाही,’ असेही त्यांनी नमूद केले.
चित्रपट निर्मात्यांनी कुटुंबीयांशी चर्चा करून ऐतिहासिक नोंदींची पडताळणी करावी, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करावा आणि विठाबाई नारायणगांवकर यांच्या कार्याला व इतिहासाला न्याय मिळेल, अशी भूमिका घ्यावी. मात्र, या चित्रपटात आवश्यक बदल न केल्यास निर्माते-दिग्दर्शकांवर कायदेशीर कारवाई करणार असून, वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही खुडे यांनी दिला.
