विद्यार्थ्यांनी फुलले आयुका!

डोळे विस्फारून ‘फोकल्ट पेंडुलम’चे निरीक्षण करताना उलगडलेले पृथ्वीच्या फिरण्याचे गमक, वेगळ्या प्रकारच्या दुर्बिणीतून सूर्यावरील डाग शोधण्याचा केलेला प्रयत्न आणि प्रत्यक्ष शास्त्रज्ञांनीच केलेली खगोलाची उकल..!

आईनस्टाईन, न्यूटन, गॅलिलिओ आणि आर्यभट्ट यांच्या पुतळ्यांशेजारी उभारून ऐकलेल्या त्यांच्या शोधांच्या रंजक कथा, डोळे विस्फारून ‘फोकल्ट पेंडुलम’चे निरीक्षण करताना उलगडलेले पृथ्वीच्या फिरण्याचे गमक, वेगळ्या प्रकारच्या दुर्बिणीतून सूर्यावरील डाग शोधण्याचा केलेला प्रयत्न आणि प्रत्यक्ष शास्त्रज्ञांनीच केलेली खगोलाची उकल..!  अशा वातावरणात पुणे विद्यापीठातील ‘आयुका’चा परिसर शुक्रवारी दिवसभर विद्यार्थ्यांनी फुलून गेला होता.
विज्ञान दिनानिमित्त ‘आयुका’चा (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स) परिसर सर्वासाठी खुला ठेवण्यात आला होता. दिवसभर विज्ञानप्रेमींसाठी व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते. विज्ञानप्रेमींबरोबरच शालेय विद्यार्थ्यांचीही या उपक्रमाला भरभरून उपस्थिती होती. अगदी लहान मुलांनाही विज्ञानाचे मजेदार चमत्कार दाखवण्यासाठी पालक आवर्जून घेऊन येत होते.
‘आस्क अ सायंटिस्ट’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि आयुकाचे संचालक डॉ. अजित केंभावी यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. तारे का चमकतात?, अंतराळातील जंतूंमुळे पृथ्वीवरच्या सजीवांना धोका पोहोचेल का?, ‘डॉपलर परिणाम’ म्हणजे काय?, अवकाशात किती मिती (डायमेन्शन्स) आहेत?, तारे गुरूत्वाकर्षणाने खाली का पडत नाहीत?, अशा प्रश्नांपासून आपण प्रकाशाच्या वेगाने कृष्णविवरात शिरलो तर बाहेर पडता येईल का, इथपर्यंतचे चौकस प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. नारळीकर आणि केंभावी यांनीही सर्व प्रश्नांचे आपल्या नेहमीच्या पद्धतीने उदाहरणे देत, हसतखेळत निरसन केले.

डॉ. नारळीकर आणि डॉ. केंभावी यांना विचारलेले हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे-
 
प्रश्न- प्रकाशाच्या वेगाने कृष्णविवरात शिरल्यास बाहेर पडता येईल का?
उत्तर- अवकाशात आपण कितीही वेगाने प्रवास केला तरी प्रकाशाचा वेग काही आपण गाठू शकणार नाही. कृष्णविवराचा गुणधर्म खेचून घेण्याचा असल्यामुळे त्यावर मात करणेही अशक्य आहे. तरीही कृष्णविवरात खेचले जाण्याची कल्पना केली तर माणसाच्या पायांपेक्षा डोक्यावर दाब जास्त असेल. त्यामुळे माणूस ताणला जाईल आणि चक्क तुटेल! त्यामुळे कृष्णविवरातून बाहेर पडता येईल का, या विचाराआधीच माणसाचा अंत झाला असेल!

प्रश्न- नासाने ४ ग्रहांवर राहण्याजोगी परिस्थिती आहे असे म्हटले आहे. हे खरेच शक्य आहे का?
उत्तर- पृथ्वी ते चंद्र हे अंतर पार करायला प्रकाशाला सव्वा सेकंद लागतो. या हिशेबाने या वसाहत करण्याजोग्या ग्रहांपर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ काढला तर ते अंतर पार करणे परवडण्याजोगे नाही. पण हे ग्रह वसाहत करण्याजोगे असतील तर अवकाशात जीवसृष्टी असण्याच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास नक्कीच होऊ शकेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Iucaa science day dr narlikar astronomy