देहू नगरीतून आज दुपारी एक वाजेच्या सुमारास जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुका एसटी बसने श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पादुका ज्या बसमधून निघाल्या आहेत ती बस फुलांनी सजवण्यात आली आहे. बसमधील पहिल्याच आसनावर पादुका ठेवल्या जाणार असून, २० मानकरी पादुकांसह पंढरपूरकडे निघाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा पालखी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी यावेळी पादुकांचे दर्शन घेतले. भारत देश लवकर करोनामुक्त होवो अशी तुकोबारायांच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली.

दरवर्षी देहू नगरीत मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहात पालखी सोहळा संपन्न होत असतो. परंतु, यावर्षी करोना विषाणूचा प्रादुर्भाव अवघ्या जगभरासह भारतात देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने पालखी सोहळा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर आज देहू नगरीतील पादुका सजलेल्या “लालपरी” मधून पंढरपूरला विठूरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाल्या  आहेत. दरम्यान, यावेळी बसमधून जाणाऱ्या मानकऱ्यांची करोना टेस्ट करण्यात आली असून 60 वर्षांवरील व्यक्तींना सोबत जाण्यास परवानगी नाही, असे शासनाने अगोदरच स्पष्ट केले आहे.

12 जून रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचा मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पडला. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर पादुका मुख्य मंदिरात विसावल्या होत्या. त्यानुसार आज 30 जून रोजी त्या एसटी बसने पंढरपूरला मार्गस्थ झाल्या आहेत. पादुका घेऊन जाणाऱ्या बसला विशेष सुरक्षा दिली जात असून श्वान पथकाकडूनही बसची तपासणी केली गेली आहे. बसच्या पुढे आणि पाठीमागे पोलीसांची वाहनं राहणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagadguru tukobarais paduka left for pandharpur by bus msr 87 kjp
First published on: 30-06-2020 at 13:14 IST