पुणे : साखरेचे दर तेजीत असताना आता गुळाच्या दरात गेल्या १५ दिवसांत किलोमागे सात ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात गुळाची दरवाढ झाली आहे. यापुढील काळात गुळाला मागणी वाढणार असून, दिवाळीपर्यंत गुळाचे दर तेजीत राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

‘श्रावण महिना गुरुवारपासून (१३ ऑगस्ट) सुरू होणार आहे. श्रावण महिन्यात गुळाच्या मागणीत वाढ होणार आहे. नागपंचमी, राखीपौर्णिमा असे महत्त्वाचे सण आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर दिवाळीत गुळाला उच्चांकी मागणी असते. ऊस लागवडीत घट झाल्यानंतर साखरेच्या दरात वाढ झाली. साखरेच्या दरात गेल्या महिन्याभरात किलोमागे सहा ते सात रुपयांनी वाढ झाली. उसाचा तुटवडा जाणवत असल्याने गूळ उत्पादनात घट झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केल्यानंतर गुऱ्हाळे बंद झाली. कारवाई झाल्यानंतर गुळाची आवक कमी झाली होती. जून महिन्यात मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजारात दररोज २० टन गुळाची आवक होत होती. गुळाची आवक आता पुन्हा वाढली आहे. साधारणपणे दररोज ५० ते ६० टन गुळाची आवक होत आहे,’ अशी माहिती मार्केट यार्ड भुसार बाजारातील गूळ व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.

‘पुणे जिल्ह्यातील दौंड, यवत, केडगाव, तसेच सांगली जिल्ह्यातून गुळाची आवक होत आहे. पुण्यातील बाजारपेठेसह नाशिक, ठाणे, भिवंडी, कल्याण येथील बाजारपेठेतून गुळाला मागणी वाढली आहे. गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश या राज्यांतून गुळाला मागणी वाढली आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

गेल्या काही वर्षांत गुळाचा चहा पिण्याचे प्रमाण वाढले आहे. चहा विक्रेत्याकंडून गुळाला मागणी वाढली आहे. उसाच्या तुटवड्यामुळे गुळाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे गुळाच्या दरात वाढ झाली आहे. – जवाहरलाल बोथरा, गूळ व्यापारी, मार्केट यार्ड, भुसार बाजार

‘एफडीए’च्या कारवाईनंतर बिगर भेसळीचा गूळ

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गुऱ्हाळांवर कारवाई केली होती. त्यानंतर रंग आणि साखरेची भेसळ न करता गुऱ्हाळात पारंपरिक पद्धतीने गूळ तयार केला जात आहे. बाजारात सध्या शुद्ध गुळाची आवक होत आहे.

गुळाचे क्विंटलचे दर

नंबर १ – ५००० ते ५१५० रुपये
नंबर २ – ४९२५ ते ५००० रुपये
नंबर ३ – ४८०० ते ४८७५ रुपये
खोक्यातील गूळ (बाॅक्स पॅकिंग) -५००० ते ६००० रुपये