पुणे : ‘बारामतीमधून निवडणूक लढविण्यास रस नाही असे सांगत बारामतीमधून जय पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर जय पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. बारामती मतदारसंघातील नीरा-वागज या गावभेट दौऱ्यावर त्यांनी तरुणांच्या अडचणी समजावून घेताना थेट क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना दूरध्वनी करत गावात तालीम उभारण्यासंदर्भात चर्चा केली.

आगामी विधानसभा निवडणुकीची बारामतीमधील लढत अजित पवार विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात होईल, अशी चर्चा होती. मात्र गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी त्यांचे चिरंजीव जय पवार बारामतीचे उमेदवार असतील, असे संकेत दिले होते. बारामतीमधून मी सात ते आठ वेळा निवडून आलो आहे. बारामतीमधून निवडणूक लढविण्यात रस नाही. कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि संसदीय समितीने तसा निर्णय घेतला तर, जय पवार बारामतीचे उमेदवार असू शकतील, असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. जय पवार बारामतीमधून निवडणूक लढविणार की नाही, याबाबत चर्चा सुरू असतानाच जय पवार यांनी बारामती मतदारसंघातील काही गावांचा गुरुवारी दौरा करत बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा >>>पुणे विमानतळावर प्रवाशांचे ‘थर्मल स्कॅनिंग’! मंकीपॉक्सचा धोका वाढताच आरोग्य यंत्रणांचे पाऊल 

बारामती मतदारसंघातील गाव भेट दौऱ्यावर असताना नीरा-वागज या गावात त्यांचे स्वागत करण्यात आले. या दौऱ्यात त्यांनी तरूणांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. गावातील काही तरुणांनी गावात कुस्तीसाठी आखाडा असायला हवा अशी मागणी केल्यानंतर जय यांनी तत्काळ राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना दूरध्वनी करून यासंदर्भात चर्चा केली. येत्या काही दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासनही जय यांनी दिले. तरुणांच्या रोजगारासंदर्भातही त्यांनी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले.