पुणे : जयगड-चिपळूण-सातारा हा द्रुतगती महामार्ग उभारणीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोकणातील महत्त्वाचे असलेले जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा प्रकल्प असेल. या ९८ किलोमीटरच्या प्रस्तावित द्रुतगती महामार्गामुळे सध्याचा सातारा ते जयगड हा सुमारे पाच तासांचा प्रवास केवळ एका तासात शक्य होणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासह त्याची व्यवहार्यता तपासण्याचे पाऊल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उचलले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड हे महत्त्वाचे बंदर आहे. या बंदराची जोडणी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांशी केली जाणार आहे. यासाठी जयगड बंदर-चिपळूण-सातारा असा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा महामार्ग ९८ किलोमीटरचा असेल. तो मुंबई-बंगळुरू महामार्गाशी कराडजवळ जोडला जाईल. या महामार्गाच्या उभारणीच्या दिशेने पहिले पाऊल आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उचलले आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासह आर्थिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. यासाठी प्राधिकरणाने निविदा मागविल्या आहेत.
या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना महामार्गाची रचना, सेवा रस्त्यांची रचना, सध्याच्या पुलांचे रुंदीकरण अथवा नवीन पुलांचे बांधकाम या प्रमुख बाबींवर भर देण्यात येईल. याचबरोबर महामार्गाचे आरेखन करताना भौगोलिक स्थितीचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. या प्रकल्पाच्या क्षेत्रात डोंगराळ भाग असल्याने बोगदाही तयार करावा लागणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करावे लागणार असून, त्यामुळे किती विस्थापितांचे पुनर्वसन करावे लागेल याचा आढावा घेतला जाईल. प्रकल्पाचा एकूण खर्च, त्याची आर्थिक व वित्तीय व्यवहार्यता विश्लेषण, पर्यावरणीय व सामाजिक परिणाम याची माहितीही सल्लागार संस्थेकडून मिळेल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.
जयगड बंदराचे महत्त्वाचे स्थान
जयगड बंदर-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गासाठी सुमारे ९ हजार ६०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जयगड हे खोल पाण्यातील बंदर असून, ते सर्व प्रकारच्या हवामानात बारमाही सुरू असते. या बंदरावरून प्रामुख्याने लोहखनिज, कोळसा, बॉक्साईट, चुनखडी यांची वाहतूक होते. याचबरोबर ते देशातील पहिले द्रविभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) आणि द्रविभूत पेट्रोलियम वायू (एलपीजी) साठवणूक केंद्र आहे. या अतिशय महत्त्वाच्या अशा बंदराला या महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्राशी जोडले जाणार आहे.
प्रकल्प नेमका कसा?
- एकूण लांबी ९८ किलोमीटर
- आठ पदरी महामार्गासाठी भूसंपादनाची योजना
- सुरुवातीच्या टप्प्यात चारपदरी महामार्ग
- नागरी क्षेत्रात १० मीटरचे सेवा रस्ते
- राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ठिकाणांशी जोडणी
प्रकल्प आराखड्यात काय?
- भूसंपादनाची आवश्यकता आणि त्याचा खर्च
- मार्गातील इमारतींची संख्या आणि त्या ताब्यात घेण्याचा खर्च
- सध्या असलेल्या सार्वजनिक सुविधा दुसरीकडे हलविण्याचा खर्च
- प्रकल्पासाठी तोडाव्या लागणाऱ्या झाडांची संख्या
