पुणे : शासनाचे महत्त्वाकांक्षी असे ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे.
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत गाव निवडीबाबत आयोजित बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. गाव आराखडा शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे तयार करावा. अभियानांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये शिवारफेरी करून पाणलोटनिहाय गावाचा आराखडा तयार करावा. हे अभियान जिल्ह्यात मोहीम स्तरावर राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी या वेळी दिले. अभियानासाठी हवेली तालुक्यातील १७ गावे, शिरूरमधील १७ गावे, खेडमधील २० गावे, मावळातील १३ गावे, जुन्नरमधील १२ गावे, आंबेगावमधील १३ गावे, पुरंदरमधील १४ गावे, वेल्ह्यातील चार गावे, मुळशी आणि भोरमधील प्रत्येकी सहा गावे, बारामती मधील ३९ गावे, इंदापूरातील ११ गावे आणि दौंड तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.