पुणे : अमेरिकेतील नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी संस्थेतील (आयुका) शास्त्रज्ञांनी विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील दीर्घिकांबाबत महत्त्वाचा शोध लावला आहे. महास्फोटानंतर (बिग बँग) अवघ्या काहीशे दशलक्ष वर्षांतच दीर्घिका अपेक्षेपेक्षा अधिक सुव्यवस्थित विकसित झाल्याचे दिसून आले असून, दीर्घिकांची निर्मिती आणि उत्क्रांतीबाबतच्या प्रचलित समजूतींना नवे आयाम मिळाले आहेत.

आयुकाने या संशोधनाबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. आयुकातील संशोधक डॉ. अंशुमान बोर्गोहाईन आणि प्रा. कनक साहा यांनी केलेल्या संशोधनाचा शोधनिबंध ‘ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. संशोधनासाठी अतिदूरच्या दीर्घिकांच्या जेम्स वेब दुर्बिणीने टिपलेल्या प्रतिमांचा अभ्यास आयुकातील शास्त्रज्ञांनी केला. पूर्वीच्या समजूतीनुसार विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील दीर्घिका विस्कळीत, अनियमित आणि विकसित होत असलेल्या अवस्थेत असाव्यात, अशी अपेक्षा होती. मात्र, शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून वेगळे चित्र स्पष्ट झाले.

विश्वाचे वय केवळ ४०० ते ९०० दशलक्ष वर्षे असताना या दीर्घिका अस्तित्वात होत्या. संशोधकांनी या दीर्घिकांमधील प्रकाशाचे वितरण अत्यंत काळजीपूर्वक मोजून त्यांच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास केला. या अभ्यासातून असे आढळले, की सुरुवातीच्या गोलाकार (स्फेरॉइडल) दीर्घिका आज आपल्या आसपास दिसणाऱ्या लंबगोल दीर्घिकांप्रमाणे ‘कॉरमेंडी रिलेशन’ या महत्त्वाच्या खगोलशास्त्रीय नियमाचे पालन करतात. हा नियम आकाशगंगेचा आकार आणि तिच्या मध्यभागातील प्रकाशमानता यांच्यातील संबंध स्पष्ट करतो. यावरून विश्वाच्या सुरुवातीच्या काळातच दीर्घिकांची मूलभूत रचना आकाराला येऊ लागली होती, हे स्पष्ट होते. या संशोधनामुळे विश्वातील पहिल्या मोठ्या दीर्घिकांची निर्मिती अल्प काळात कशी झाली, त्या इतक्या लवकर सुव्यवस्थित कशा निर्माण झाल्या, या बाबतच्या सिद्धांतांना नवी दिशा मिळणार आहे, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

जेम्स वेब दुर्बिणीच्या विलक्षण क्षमतेमुळे विश्वातील सर्वात प्राचीन दीर्घिकांचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. या निरीक्षणांमुळे दीर्घिकांची निर्मिती आणि उत्क्रांतीबाबत असलेल्या प्रचलित समजुतींना नवे आयाम मिळत आहेत. – डॉ. अंशुमान बोर्गोहाईन, संशोधक

गेल्या अनेक दशकांपासून खगोलशास्त्रज्ञ दीर्घिकांच्या उत्क्रांतीचा मागोवा घेण्यासाठी ‘कॉरमेंडी रिलेशन’सारख्या नियमांचा वापर करतात. मात्र, जेम्स वेब दुर्बिणीपूर्वी विश्वाच्या पहिल्या अब्ज वर्षांतील आकाशगंगांचा तपशीलवार अभ्यास करता आला नव्हता. आता पहिल्यांदाच त्या काळातील दीर्घिकांची रचना थेट पाहता येत आहे. – प्रा. कनक साहा, खगोलशास्त्रज्ञ