पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टरांनी महिन्यातून एकदा रुग्णांची तपासणी व उपचार मोफत करावेत, असे आवाहन केले होते. या आवाहनाला पुण्यातील डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून, पुणेकरांना आता महिन्यातून एक दिवस तपासणी आणि उपचार मोफत मिळणार आहेत. या अंतर्गत पुण्यात दर महिन्यात ९ तारखेला अनेक डॉक्टर, रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्था मोफत तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देणार आहेत.

‘जन सेहत सेतू’ या मोहिमेची सुरूवात पुण्यातून झाली आहे. लवकरच ही मोहीम देशभरात राबविली जाणार आहे. केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते नुकतेच ‘जन सेहत सेतू’ मोहिमेचे उद्घाटन व पोर्टलच्या लोकार्पण नुकतेच झाले. ‘निरोगी भारत, समृद्ध भारत व विकसित भारत’ ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांसह प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. त्या दृष्टीने महिन्यातून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्याच्या ‘जन सेहत सेतू’ मोहिमेत वैद्यकीय व्यावसायिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या मोहिमेंतर्गत वैद्यकीय व्यावसायिक दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत उपचार देणार आहेत. यात स्वयंसेवी संस्थांची मदतही घेतली जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे, ‘फोर्स वन’चे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. कृष्णप्रकाश, महापालिकेच्या आरोग्यप्रमुख नीना बोराडे, न्यूरोमायलिटिस ऑप्टिकाचे अध्यक्ष अमोल लुंकड, संघटक प्रशांत चौधरी, रोटरी क्लब आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जनतेला निरोग ठेवण्याची जबाबदारी

केंद्रीय मंत्री डॉ. मांडविया म्हणाले की, वैद्यकीय व्यावसायिकांवर नागरिकांना निरोगी ठेवण्याची जबाबदारी आहे. देशात ७५ वर्षांपूर्वी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसे, त्या वेळी वेदशाळांच्या माध्यमातून नागरिकांवर उपचार होत असत. त्या वेळी उपचारासाठी पैशाला प्राधान्य दिले जात नव्हते. त्यामुळे डॉक्टरांचे काम म्हणजे व्यवसाय नसून, एक जबाबदारी आहे, हे लक्षात घ्यावे. पुण्यातील विविध संघटना व संस्थांच्या पुढाकाराने तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांनी पुढे येऊन दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने ‘जन सेहत सेतू’ अभियान राबविण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. या शिबिरांसाठी आशासेविका, सेवाभावी संस्था, तसेच संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांना व्यापक बनवावे.

प्रतिबंध महत्वाचा

आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, ‘जन सेहत सेतू या मोहिमेच्या माध्यमातून एक दिवस सेवा समर्पित करणे हे महाराष्ट्रातील व देशातील आदर्श उदाहरण ठरेल. देशातील महत्त्वपूर्ण अशी आरोग्य सेवा शिबिरांच्या माध्यमातून देण्याची सुरुवात पुण्यातून होत आहे. सर्व डॉक्टरांनी या अभियानाची सुरुवात करावी. वैद्यकीय सेवेत अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे; परंतु, उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा आहे. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. जन सेहत सेतू शिबिरांची सुरुवात संपूर्ण देशात व्हावी.’