जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री जानाई देवी पालखीचे आज निवकणे (ता .पाटण जि. सातारा) येथील यात्रेला जाण्यासाठी मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. यावेळी पालखीला निरोप देण्यासाठी हजारो ग्रामस्थांची गर्दी केली.
जेजुरीकर ग्रामस्थांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत असलेल्या श्री जानाई देवीची पारंपारिक यात्रा बुधवारी (२५ फेब्रुवारी) निवकणे येथे भरणार आहे. या यात्रेसाठी दरवर्षी जेजुरी येथील श्री जानाई देवीची पालखी चांदीच्या रथातून पायी वारी करीत नेली जाते.
यंदाही पालखी बरोबर दीड हजारापेक्षा जास्त भक्त चालत आहेत. या पालखी सोहळ्याची व्यवस्था श्री जानाई देवी पालखी पदयात्रा अन्नदान ट्रस्ट तर्फे केली जाते. गुरुवारी दुपारी तीन वाजता पालखी सोहळ्याने जेजुरीतील मेंडके वाड्यातून प्रस्थान ठेवले. जेजुरी शिवेवर पालखी आल्यावर तेथे परडी पूजन व आरती करण्यात आली.
पालखी ग्रामस्थांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. पालखीला निरोप देण्यासाठी जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे , नगरसेवक श्री मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, श्री जानाई देवी अन्नदान मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सहा वाजता देवीची आरती झाल्यानंतर पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला.
पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम कामठवाडी (ता.पुरंदर), तर पुढील मुक्काम सातारा जिल्ह्यातील सालपे, वडूथ, तारळे येथे असणार आहे. पालखी सोहळा येत्या मंगळवारी पाटण तालुक्यातील निवकणे येथे पोहोचणार आहे. पाटण तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या डोंगरदऱ्यामध्ये श्री जानाई देवीचे मुख्य ठिकाण आहे. बुधवारी निवकणे येथे देवीचे स्नान परडी पूजन व मुख्य यात्रा (चौक) होणार आहे.
मंगळवारी कावदरा येथे निसर्ग पूजा
येत्या मंगळवारी पालखी सोहळा सकाळी सात वाजता तारळे गावाजवळील कावदरा (तवा )येथे पोहोचणार आहे . हा परिसर निसर्गाने समृद्ध आहे. या ठिकाणी उंच डोंगर, खोल दऱ्या व दाट झाडी आहे. यावेळी निसर्गाची पूजा केली जाणार आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या भक्ती भावाने निसर्ग पूजा करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातो.
