scorecardresearch

पुणे-मुंबई महामार्गावरील ‘तो’ टोल नाका बंद करण्याची जनसेवा विकास समितीची मागणी

केंद्र आणि राज्यशासनाची मुदत संपली असून बेकायदेशीरपणे टोलनाका सुरू आहे, असा आरोप विवेक वेलणकर यांनी केला आहे.

जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे फाटा येथील टोल नाका बंद करण्यात यावा. केंद्र आणि राज्यशासनाची मुदत संपली असून बेकायदेशीरपणे टोलनाका सुरू आहे. नितीन गडकरी यांनी सांगितल्या प्रमाणे तो टोलनाका साठ किलोमीटरच्या आत येतो त्यामुळं तो बंद करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली आहे. ते मावळमधील सोमटणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

वेलणकर म्हणाले की, २००४ मध्ये केंद्रसरकार ने राज्यसरकारला सोमटणे येथील टोलनाका ८८० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी चालवायला दिला होता. तो राज्यसरकारने तिसऱ्याच कॉन्ट्रॅक्टरला चालवायला दिला. २००४ ते २०१९ या दरम्यान दोन हजार कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्टरला मिळाले आहेत. त्यामुळं या टोलनाक्याची केंद्र आणि राज्याची वसुली (मुदत) पूर्ण झाली आहे. म्हणून आता टोलची गरजच नाही. असं विवेक वेलणकर म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले की, परवा नितीन गडकरी यांनी सांगितलं की ६० किलोमीटरच्या आत दुसरा टोलनाका नसावा, हा नियम इथे लागू होतो. २००४ मध्ये देखील १९९७ च्या धोरणानुसार ८० किलोमीटरच्या आत टोल नसला पाहीजे होता. मात्र ६० आणि ८० किलोमीटरमध्ये हा टोलनाका येत असताना देखील तो बेकायदेशीरपणे सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. आतातरी हा टोलनाका बंद करावा अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

दरम्यान, टोल बंद न झाल्यास अधिक तीव्रतेने आंदोलन करणार असल्याचे जनसेवा विकास समितीने राज्य आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे. तर, ६० किलोमीटरच्या आतील टोल बंद करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं असल्याने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Janseva vikas samiti demands closure of somtane toll gate on pune mumbai highway msr 87 kjp