बँकिंग क्षेत्रात मंदीचे वातावरण असताना जनता सहकारी बँकेला ६५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या ठेवी आणि कर्ज अशी एकूण उलाढाल १२ हजार ८०५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे.
बँकेचे अध्यक्ष अरिवद खळदकर आणि उपाध्यक्ष संजय लेले यांनी सोमवारी ही महिती दिली. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये खळदकर यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षांतील कामगिरीचा आढावा घेतला. बँकेच्या चालू आर्थिक वर्षांत हडपसर, पाषाण-सूस रस्ता, पिरंगुट आणि मोशी यासह आठ शाखा नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. इचलकरंजी येथील चौंडेश्वरी सहकारी बँकेचे ४ जुलै रोजी जनता सहकारी बँकेत विलीनीकरण होणार असल्याचे खळदकर यांनी सांगितले. खळदकर म्हणाले,की गेल्या आर्थिक वर्षांत बँकेने सर्वच आघाडय़ांवर लक्षणीय कामगिरी केली आहे. बँकेने १२ हजार ८०५ कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. निव्वळ नफा ६४ कोटी ९७ लाख रुपयांपर्यंत झाला असून ही वाढ बँकिंग व्यवसायातील परिस्थितीशी तुलना करता समाधानकारक आहे.