पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अन्य काही जणांनी केलेला जपान दौराही आता वादग्रस्त ठरला असून या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या काही कंपन्यांबरोबर झालेल्या बैठका तसेच त्यांच्यासमोर सादर झालेले लाईल रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण आदी गोष्टींबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. पदाधिकाऱ्यांचे यापूर्वीचे दौरेही वादात सापडले होते.
महापालिकेचे पदाधिकारी व अन्य काही जण नुकतेच जपान दौऱ्यावरून परतले आहेत. हा दौरा वैयक्तिक स्वरूपाचा व वैयक्तिक खर्चाने केलेला होता, असे सांगितले जात असले, तरी सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार यांनी दौऱ्याबाबत अनेक आक्षेप घेतले आहेत. या आक्षेपांची पत्रेही त्यांनी महापालिकेत दिली आहेत. मात्र, कोणत्याही विभागांकडून दौऱ्याची योग्य प्रकारे माहिती दिली जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. तसे पत्र त्यांनी सोमवारी आयुक्तांना दिले.
जपानची तोशिबा कंपनी गेली काही वर्षे शिवाजीनगर ते हिंजवडी या दरम्यानच्या लाईल रेल्वे प्रकल्पासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकल्पासाठीचे सर्वेक्षण व त्याचा अहवालही कंपनीने स्वत:हून केलेला आहे. जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सी या कंपनीने अर्थपुरवठा केला आहे. हा अहवाल फेब्रुवारी महिन्यात महापालिकेला सादर झाला. मात्र, या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर हा प्रकल्प पुण्यासाठी व्यवहार्य ठरणार नाही, असा स्पष्ट अभपिं्राय महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. मेट्रोच्या तुलनेत हा प्रकल्प खर्चिक आहे आणि अन्यही कारणांमुळे तो पुण्यात राबवणे योग्य ठरणार नाही, असे महापालिका प्रशासनाचे मत आहे. तसे मत प्रशासनाकडून स्थायी समितीपुढे ९ मे रोजी सादर करण्यात आले. मात्र हा विषय स्थायी समितीने ३ जून पर्यंत पुढे ढकलला. नेमका याच काळात जपान दौरा झाल्यामुळे या विषयाचे आता काय होते ते लवकरच कळेल. हा विषय स्थायी समितीपुढे असल्यामुळेच दौऱ्यातील कार्यक्रमांबाबत माहिती दिली जात नसल्याचे आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका कोणत्या कंपन्यांबरोबर झाल्या, त्यांना कोणी आमंत्रित केले होते, या बैठकांमध्ये काय ठरले याचा वृत्तान्त तसेच दौऱ्याबाबत झालेला संपूर्ण पत्रव्यवहार व दौऱ्याची वस्तुस्थिती महापालिकेने नागरिकांसाठी संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
       आमचा हा दौरा पूर्णत: वैयक्तिक खर्चाने केलेला होता. त्यामुळे कोणाच्याही परवानगीची गरज नाही. या दौऱ्यासाठी महापालिकेच्या निधीतून कोणताही खर्च झालेला नाही. तेथे आम्ही विविध प्रकल्पांना भेट दिली. बैठका झाल्या. त्यात तेथील लाईल रेल्वे, मेट्रो वगैरे सर्वच प्रकल्पांचा समावेश होता. मात्र तेथे आम्ही फक्त माहिती घेतली. कोणतेही करार केलेले नाहीत.
                                                                                         महापौर चंचला कोद्रे