पुणे : राज्य सरकार पुणे जिल्ह्यात सुपे येथे जपानी कंपन्यांसाठी ‘क्लस्टर’ उभे करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी शुक्रवारी दिली.

‘राज्याच्या वेगवेगळ्या भागांत क्लस्टर उभे राहत असून, त्याचा उद्योगवाढीसाठी फायदा होणार आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थचक्रालाही गती मिळेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लघु उद्योग भारतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात धवसे बोलत होते. त्यांनी ‘महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या ध्येयात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची भूमिका’ या विषयावर भाष्य केले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमित घैसास यांनी धवसे यांच्याशी संवाद साधला.

धवसे म्हणाले, ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे राज्याच्या आर्थिक विकासात सक्रिय भूमिका बजावतात. आता राज्याच्या आर्थिक प्रगतीचा वेग वाढत आहे. त्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला पाठबळ देण्यात येत असून, महाराष्ट्राला अग्रेसर करण्यात त्याचा फायदा होणार आहे. या उद्योगांनीही पुरवठा साखळी समजावून घेऊन काम करण्याची गरज आहे.’

‘यापूर्वी राज्यातील उद्योग-व्यवसाय हे मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे या भागांपुरते मर्यादित होते. त्यामुळे काही प्रमाणात प्रादेशिक असमतोल निर्माण झाला होता. आता हा असमतोल दूर होत असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर या भागांचाही मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होत आहे. आतापर्यंत गडचिरोलीचा परिसर हा नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जायचा. त्याचेही रूप बदलत असून, तिथेही ‘स्टिल इंडस्ट्री’चा विकास होत आहे.’

दरम्यान, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या उद्योगासाठी राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालय करण्याची मागणी लघु उद्योग भारतीच्या वतीने करण्यातआली. नचिकेत फडके यांनी सूत्रसंचालन केले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज देताना त्यांना आकारण्यात येणारे व्याजदर कमी करण्याची गरज आहे. या उद्योगांना पुढे नेण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांना आवश्यक असणारी सर्व मदत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. – कौस्तुभ धवसे, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक व धोरण)