पुणे : देशात ३ हजारांहून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. अनेकदा आयटीआयकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहिले जाते. मात्र, आता या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून बदल घडवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी ६० हजार कोटी रुपयांची योजना आहे, अशी माहिती देत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी खासगी संस्था, कौशल्य विद्यापीठे, उद्योग क्षेत्रांनी आयटीआय संस्थांना सक्षम करण्याची गरज आहे, असे मत मांडले.

सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठातर्फे आयोजित विमेन लिडिंग द फ्यूचर ऑफ वर्क या परिषदेच्या उद्घाटनावेळी चौधरी बोलत होते. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, विद्यापीठाच्या प्र कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, युनेस्कोच्या दक्षिण आशिया विभागाचे शिक्षण विभाग प्रमुख जिआन शी तेंग, नॉर्वेच्या महावाणिज्यदूत मोनिका नेगेलगार्ड, ऑस्ट्रेडच्या व्यापार आणि गुंतवणूक आयुक्त मेरी ओव्हरिंग्टन या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात जेंडर इन्क्युजन अँड स्कील डेव्हलपमेंट या विषयासाठी सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाला प्रदान करण्यात आलेल्या ‘युनेस्को चेअर’चे उद्घाटनही करण्यात आले.

चौधरी म्हणाले, आजवरचा देशाचा इतिहास पाहिल्यास महिलांचा सहभाग फार कमी असल्याचे दिसते. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. भारतातील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित (स्टेम) क्षेत्रातील पदवीधरांमध्ये ४३ टक्के महिला आहेत. हे प्रमाण जागतिक स्तरावरही मोठे आहे. महिला आता प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू झाल्या आहेत. तरुण मुलींच्या कौशल्य विकासावर भर देण्यासाठी नव्या नावाचा उपक्रम सुरू केला आहे. स्टार्टअप इंडियाअंतर्गत २.२३ लाख नवउद्यमी नोंदणीकृत आहेत. त्यापैकी सुमारे एक तृतीयांश नवउद्यमी महिलांच्या नेतृत्त्वाखालील किंवा महिलांचा सहभाग असलेल्या आहेत. मात्र, या नवउद्यमी युनिकॉर्न होतात का, संपत्ती निर्मिती करतात का, हे महत्त्वाचे आहे. नेतृत्त्वस्थानी महिला असलेल्या कंपन्या अधिक नफा कमावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे उद्योगांनी अधिकाधिक महिलांना संधी देण्याची गरज आहे.

तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदल होत असताना महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग वाढणे सकारात्मक आहे. जग बदलत असताना महिलांनी बदलाचे नेतृत्त्व केले पाहिजे. राज्यात महिलांना मदत करण्याच्या पलीकडे जाऊन महिलांना अर्थव्यवस्थेत सक्रीय करण्यावर भर देण्यात येत आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत २० लाखांहून अधिक महिला स्वमदत गटांशी जोडल्या जाऊन स्वत:चे व्यवसाय सुरू आहेत. महिलांच्या कौशल्य विकासासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत, असे तटकरे यांनी नमूद केले.

गेल्या तीन वर्षांत विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित (स्टेम) अभ्यासक्रमांमध्ये मुलींच्या नोंदणीचे प्रमाण १० टक्क्यांवरून १६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. प्लेसमेंट ४६ टक्क्यापर्यंत वाढली आहे. कुशल महिला, सक्षम समाज, प्रगत देश हे उद्दिष्ट आहे. युनेस्को चेअरच्या माध्यमातून महिलांसाठी स्टेम शिक्षणाला प्राधान्य, मुलींसाठी दर्जेदार आणि समावेशक शिक्षण, कौशल्य परिसंस्थेचे विकसन, शिक्षक क्षमतावृद्धीसाठी काम करण्यात येत आहे, असे डॉ. स्वाती मुजुमदार यांनी सांगितले.

‘जैसे थे’ स्थितीला आव्हान देणे गरजेचे

आपली व्यवस्था ही परिस्थिती जैसे थे टिकवण्यासाठी तयार झाली आहे. बदल होऊ नये ही प्रवृत्ती’ असते. मात्र, आता तरुण विद्यार्थ्यांनी या ‘जैसे थे’ स्थितीला आव्हान दिले पाहिजे, चुकीच्या गोष्टी न स्वीकारता ठामपणे प्रश्न विचारले पाहिजेत, असेही चौधरी यांनी नमूद केले. .