पुणे : एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांकडून कर्मचारी कपात, कॅम्पस नोकरभरतीमध्ये घट असे वास्तव आणि दुसरीकडे अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदवी प्रवेशासाठीच्या ‘संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य’ला (जेईई-मेन) बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र गेल्या दहा वर्षांत झालेली प्रचंड वाढ. या परीक्षेच्या विद्यार्थी नोंदणीच्या आकडेवारीचीही ही कहाणी. करिअरचा सुरक्षित पर्याय असल्याचा दृढ समज, ‘एआय’मधील नवे विषय शिकण्याची संधी, पदवीनंतर वेगळ्या विद्याशाखेतील उच्च शिक्षण घेण्याची सुकरता आणि नव्या शैक्षणिक धोरणामुळे मानव्यविद्या शाखेतील उपविषय घेण्याचा पर्याय यांमुळे अभियांत्रिकीचे वलय अजूनही कायम आहे.

आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी अशा केंद्रीय संस्थांमधील प्रवेशाची पहिली पायरी आणि देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील अखिल भारतीय १५ टक्के कोट्यातील जागांसाठी मिळणारी ग्राह्यता असे लक्ष्य ठेवून विद्यार्थी ‘जेईई-मेन’साठी नोंदणी करतात. आकडेवारी पाहिली असता, २०१७ मध्ये या परीक्षेला ९.५६ लाख विद्यार्थी बसले होते. करोनाकाळातील थोडी घट वगळता संख्या वाढत जाऊन यंदा २०२६ च्या परीक्षेसाठी १६.०४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे दिसते.

‘पूर्वी बारावीला जे महत्त्व होते, तेच आता अभियांत्रिकी पदवीला आले आहे. अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यावर एमबीए, स्पर्धा परीक्षा किंवा अन्य काहीही करता येते, असा विचार विद्यार्थी, पालक करतात. करिअरच्या वेगळ्या क्षेत्रांची माहिती विद्यार्थी, पालकांना नाही किंवा करिअरचे पर्याय सांगूनही ते त्यांना पटत नाहीत. त्यामुळे बहुसंख्यांचा ओढा अभियांत्रिकीकडेच असल्याचे दिसते,’ असे करिअर समुपदेशक डॉ. भूषण केळकर यांनी सांगितले.

‘माहिती तंत्रज्ञानातील नोकर्‍या ‘एआय’मुळे कमी होत असल्या, तरी रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलची मागणी वाढत आहे. तसेच, आयआयटीच्या वाढलेल्या जागा, एनआयटी, आयआयआयटीमध्ये असलेल्या संधी हीसुद्धा काही कारणे आहेत. शिवाय, ‘जेईई-मेन’ची तयारी अन्य परीक्षांसाठी उपयोगी ठरते,’ असे निरीक्षण अभियांत्रिकी शाखेच्या स्पर्धा परीक्षांचे तज्ज्ञ मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर यांनी नोंदवले.

अभियांत्रिकीकडे ओढा वाढत असला, तरी विद्यार्थी-पालकांनी या शिक्षणाबाबत सजग राहणे गरजेचे असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘‘जेईई-मेन’ला वाढती नोंदणी ही सूज आहे. एक तर अभियांत्रिकी पदवीचे आता सुमारीकरण झाले आहे. त्यातून ‘एआय’चा सर्वच क्षेत्रांवर किती व्यापक परिणाम होणार आहे, याचा अंदाज विद्यार्थी, पालकांना आलेला नाही,’ असे केळकर यांनी सांगितले.

मंगेशकर म्हणाले, ‘झटपट पैसा मिळवण्यासाठी अभियांत्रिकीशिवाय दुसरे क्षेत्र नाही, असे विद्यार्थ्यांना वाटते. मात्र, आता परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. ‘एआय’मुळे नोकर्‍या कमी होत आहेत. नोकरभरतीची नेमकी आकडेवारी जाहीर होत नाही. कोट्यवधींचे पॅकेज मोजक्याच लोकांना मिळते. त्यामुळे बाजारातील बदलत्या परिस्थितीची पालक, विद्यार्थ्यांना जाणीव व्हायला आणखी दोन ते तीन वर्षे लागतील.’ अर्थात, अभियांत्रिकीचे वलय लोप पावेल, असे होईल, असे तज्ज्ञांना वाटत नाही.

‘मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलसारख्या मूलभूत शाखांचे महत्त्व टिकून आहे. शिवाय, राष्ट्रीय शिक्षण धोरणातील उपविषय निवडण्याच्या तरतुदींमुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसह अर्थशास्त्र, मानसशास्त्र असे विषय शिकता येत आहेत. त्यामुळे येत्या काळात अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वरूपच बदलू शकते,’ असे केळकर सांगतात, तर मंगेशकर यांच्या मते, ‘अस्थिर जागतिक परिस्थिती, व्हिसा निर्बंधांसारख्या कारणांनी परदेशात जाण्याचेही प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे करिअरचे सक्षम पर्याय दिसेपर्यंत अभियांत्रिकीकडे असलेला कल कायम राहील.’