पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई मुख्य परीक्षेच्या निकालात पुण्याच्या सिद्धार्थ आठल्येने १०० पर्सेंटाइल प्राप्त केले आहेत.
क्रिकेट खेळणे, सिंथेसायझर वादनाची आवड असलेल्या सिद्धार्थने सहा ते आठ तास अभ्यास करून परीक्षेत यश संपादन केले असून, आता ‘आयआयटी’ प्रवेशाच्या दृष्टीने ‘जेईई ॲडव्हान्स्ड्’ परीक्षेकडे त्याचे लक्ष लागले आहे.
‘एनटीए’ने जाहीर केलेल्या निकालात देशातील २६ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत. त्यांपैकी राज्यातील सिद्धार्थ आठल्ये, माधव विराडिया या दोघांनी १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत. सिद्धार्थ आठल्ये याने पुण्यातील लोकसेवा ई-स्कूलमधून बारावीची परीक्षा दिली आहे. तसेच ब्ल्यू रीज स्कूलमधून त्याने ९९ टक्क्यांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
सिद्धार्थने ‘जेईई मुख्य’ परीक्षेची तयारी करतानाच त्याची क्रिकेट, सिंथेसायझरवादनाची आवड जपली. सिंथेसायझरवादनाच्या ट्रिनिटी कॉलेजच्या पाच परीक्षाही तो उत्तीर्ण झाला आहे.
जेईई मुख्य परीक्षेच्या तयारीविषयी सिद्धार्थ म्हणाला, ‘अकरावीपासून खऱ्या अर्थाने परीक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली. पण, आठवी ते दहावीदरम्यान या विषयांची रुची वाढवण्याचा प्रयत्न करीत होतो. अकरावी, बारावीच्या काळात मी किती वेळ अभ्यास केला हे मोजत नव्हतो. पण, साधारणपणे सहा ते आठ तास अभ्यास होत असावा. १५ लाख विद्यार्थी या स्पर्धेत असल्याची जाणीव झाल्यामुळे परीक्षा जवळ आल्यावर ताण वाढला होता. परीक्षेच्या पहिल्या सत्रातील परीक्षेवेळी दडपण आले होते. त्यामुळे त्या परीक्षेचा फार चांगला निकाल आला नाही. मात्र, दुसऱ्या परीक्षेवेळी स्वत:मध्ये सुधारणा केली. ‘आता दुसऱ्या प्रयत्नात मजा करणार आहे,’ ‘जेवढे जमेल तेवढे करणार, आनंदाने करणार’ हे स्वत:ला समजावले होते. त्याचा मला खूप फायदा झाला.’
‘सिद्धार्थने ताण न घेता अभ्यास केला. तो आठवीपर्यंत खूप क्रिकेट खेळायचा. मात्र, त्या वेळची मेहनत करण्याची सवय ‘जेईई मुख्य’ परीक्षेच्या अभ्यासात कामी आली,’ अशी भावना सिद्धार्थची आई प्राजक्ता आठल्ये, वडील श्रीकांत आठल्ये यांनी व्यक्त केली. सिद्धार्थचे वडील स्थापत्य अभियंता आहेत, आईदेखील अभियंता आहे. तर बहीण आयआयटी मुंबईतून रसायन अभियांत्रिकीमध्ये पदवी मिळवून आता परदेशात कार्यरत आहे. सिद्धार्थने जेईई मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी बाकलीवाल ट्युटोरिअल्समध्ये शिकवणी लावली होती.
‘परीक्षेच्या तयारीच्या काळात आई-वडील, बहीण, सर्व शिक्षकांनी या प्रवासात खूप मोलाची मदत केली, मार्गदर्शन केले. काहीही समस्या आली, तर त्यांनी दिशा दाखवली. ‘जेईई मुख्य’नंतर आता ‘जेईई ॲडव्हान्स’ परीक्षा देणार आहे. ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ ही स्वतंत्र परीक्षा आहे.
‘जेईई मुख्य’ परीक्षेच्या निकालाचा त्या परीक्षेशी काही संबंध नाही. त्यामुळे आतापर्यंत जे काही शिकलो आहे, त्या आधारे ‘जेईई ॲडव्हान्स्ड’मध्ये पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार आहे. कोणती आयआयटी, कोणती शाखा याचा अजून काहीही विचार केलेला नाही. सध्या तरी संशोधन क्षेत्रात काही करण्यापेक्षा नोकरी करण्याला प्राधान्य देणार आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली.
