विशेष मुलांसाठी गेली चौतीस वर्षे लक्षणीय कार्य करीत असलेल्या जीवनज्योत मंडळाला आता वेध लागले आहेत ते मुला-मुलींसाठीच्या वसतिगृहाचे. संस्थेतर्फे गेली वीस वर्षे पुण्यात वसतिगृह चालवले जात आहे, पण त्याच्या विस्ताराची तीव्र निकड भासत असल्यामुळे विशेष मुलांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणारे नवे वसतिगृह हा संस्थेचा पुढचा टप्पा आहे.
इथे सांभाळत नाहीत, सामावून घेतात..
जीवनज्योत मंडळातर्फे चालवल्या जाणाऱ्या पौड रस्त्यावरील वसतिगृहात सध्या चाळीस मुले-मुली आहेत. या विशेष मुलांच्या सर्व गरजा व अडचणी ओळखूनच या वसतिगृहाची रचना करण्यात आली आहे आणि या मुलांच्या सर्वागीण प्रगतीसाठीही संस्था सेवाभावी वृत्तीने काम करीत आहे. एखाद्या आजाराने विशेष मुलगा वा मुलगी अगदी अंथरुणाला खिळून राहिली, तरच अशा मुलाचा सांभाळ अवघड होतो. अन्यथा, या मुलांची तहहयात काळजी घेण्याची तयारी संस्थेने केलेली आहे. सध्यादेखील चाळीस, पन्नास वय ओलांडलेल्यांचाही सांभाळ वसतिगृहात केला जात आहे. विशेष मुला-मुलींना शिक्षण देण्यापासून ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत आणि त्यांच्या खाण्या-पिण्यापासून ते त्यांना मायेने सांभाळण्यापर्यंत सर्व कामे जीवनज्योत मंडळात होत आहेत. तरीही सध्याची व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे या वसतिगृहांचा विस्तार संस्था करणार आहे. तशा योजनाही संस्थेने आखल्या आहेत.
 हितचिंतकांकडून मिळणाऱ्या देणग्यांवरच संस्थेचे कार्य आजवर सुरू राहिले आणि पारदर्शी कारभार व निरलस कार्यकर्त्यांच्या जोरावर पुढेही ते तशाच पद्धतीने सुरू राहणार आहे.