जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा देवास वाहण्यासाठी पुन्हा काही दुकानदारांकडून रसायनयुक्त भंडाऱ्याची विक्री सुरू करण्यात आल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतीच सोमवती यात्रा झाली. या यात्रेच्यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे जेजुरीत येणार, अशी चर्चा सुरू असल्याने रसायनयुक्त भंडारा बाजारात आला नाही.
मात्र, यात्रा झाल्यानंतर पुन्हा काही ठिकाणी रसायनयुक्त बनावट भंडाऱ्याची विक्री सुरू झाल्याच्या तक्रारी येत आहेत.श्री खंडोबा देवास भंडार व खोबरे अर्पण करण्याची पद्धत आहे. भंडार म्हणजे शुद्ध हळकुंडाची हळद मानली जाते. ही हळद खंडोबाला प्रिय आहे. मात्र, गेली अनेक वर्षे जेजुरीत काही ठिकाणी रसायनयुक्त भंडाऱ्याची विक्री केली जात आहे. त्यामध्ये हळकुंडाची पावडर नसते, तर विविध रसायने वापरून भंडार बनवला जातो.
परराज्यांतील कारखान्यांमध्ये तयार होणारा हा भंडारा राज्यातील अनेक देवस्थानच्या ठिकाणी पुरवला जातो. सहा महिन्यांपूर्वी जेजुरी नगरपालिकेची निवडणूक झाली. यावेळी खंडोबा गडाच्या पायथ्याशी भंडारा उधळल्याने लागलेल्या आगीत दोन महिला नगरसेविकांसह १६ जण गंभीर भाजले होते. त्यानंतर अन्न औषध प्रशासन खात्याने जेजुरीत छापे टाकून भंडार वाहतूक करणारा एक टेम्पो जप्त केला.
कंपन्या, विकेत्यांवर कारवाईची मागणी
खंडोबा गडावर येणाऱ्या अनेक भाविकांनी आणलेल्या भंडार खोबऱ्याच्या पिशव्यांमध्ये रसायनयुक्त भंडारा दिसून येत आहे. १३ जुलै रोजी जेजुरीत माउलींचा पालखी सोहळा येणार आहे. त्यावेळी वारकरी बांधव मोठ्या संख्येने गडावर येतात. त्यांना चांगला भंडार मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधून रसायनयुक्त भंडार बनवणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांनी सांगितले.
