जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी परिसरातील देवमळा येथील शेतकऱ्यांनी लागवड केलेली दवण्याची शेती आता बहरली असून, शेतात पसरलेला सुगंध चैत्र मासाच्या आगमनाची चाहूल देत आहे.

जेजुरी परिसरातील दवणा राज्यात प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र जेजुरीचा खंडोबा, भगवान शंकराचा अवतार मानला जातो. या देवाला भंडार-खोबऱ्याबरोबर बेल, दवणा अर्पण करतात. पाडव्यापासून चैत्र मासातील शुक्ल पक्षात विविध देवी-देवतांना सुगंधी दवणा अर्पण करण्याची प्रथा आहे.

जेजुरी परिसरातील देव मळ्यामध्ये राहणारे शेतकरी दर वर्षी दवण्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. खंडोबा गडाच्या पायथ्याशी हार-फुले विक्रेत्या महिलांच्या पाट्यांमध्ये सुगंधी दवण्याच्या आकर्षक पेंढ्यांची १५ दिवसांपासूनच विक्री सुरू झाली आहे.

जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरचा जोतिबा, शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव, लोणावळ्याची एकवीरा देवी आदी देवी-देवतांना चैत्र मासात दवणा मोठ्या प्रमाणात वाहतात. त्यामुळे त्या परिसरात दवण्याचे उत्पादन घेतले जाते. चैत्रात गावोगावी भैरवनाथाचे आणि ग्रामदेवतेचे उरुस सुरू होतात. या वेळी प्रामुख्याने देवाला दवणा अर्पण करण्याची पद्धत आहे. गुढीपाडव्याला गुढी उभारतानाही दवणा वापरला जातो.

दवण्याचे मूळ नाव दमन असून, दमन करणे म्हणजे नष्ट करणे. याचा अपभ्रंश होऊन दवणा शब्द रूढ झाल्याचा इतिहास सांगितला जातो. जेजुरीत तयार होणारा दवणा कोथिंबिरीसारख्या पेंढ्या बांधून पुणे, मुंबई, नागपूर आदी भागांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. याची लागवड कार्तिक महिन्यात केली जाते. पाडव्याच्या आधी पंधरा दिवस दवणा तयार होतो. सध्या दवण्याला मागणी वाढत आहे. पुण्यात सणाच्या दिवशी प्रामुख्याने तुळशीबागेच्या परिसरात शेतकरी दवण्याची विक्री करतात.

दवण्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची गरज

देवमळ्याचे नाव पूर्वी दवणे मळा होते. खंडोबाच्या श्रद्धेपोटी येथे दवण्याची लागवड केली जाते. नागनाथ झगडे, निवृत्ती झगडे, जयराम झगडे, विलास झगडे यांनी नेहमीप्रमाणे लागवड केली आहे. दवण्याचा उपयोग सण-उत्सवाबरोबरच विविध औषधांमध्ये केला जातो. दवण्यापासून अत्तरे, उदबत्ती, धूप तयार केले जातात. दवणा वात, पित्त, कफ या त्रिदोषावर गुणकारी मानला जातो. मात्र, दवण्यावर प्रक्रिया करणारा उद्योग नसल्याने केवळ विक्रीवरच सर्वांना अवलंबून राहावे लागते. या वनस्पतीविषयी अधिक माहिती मिळणे गरजेचे असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.