श्रीक्षेत्र जेजुरी येथे पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त भरलेल्या पारंपरिक गाढव बाजारात सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली. सुमारे बाराशे गाढवांची या वेळी विक्री झाली. यामध्ये गुजरात व राजस्थानमधून आणलेल्या गाढवांचा समावेश होता. आठ ते दहा हजार रुपये गावठी गाढवांच्या किमती होत्या तर काठेवाडी गाढवांना वीस हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
जेजुरीतील बंगाळी पटांगणामध्ये दरवर्षी पारंपरिक गाढव बाजार भरविला जातो. ग्रामीण भागात गाढव हे उपयुक्त जनावर म्हणून ओळखले जाते. उंच डोंगरावर अडचणीच्या ठिकाणी, खोल डोंगर दरीत, दुर्गम भागात माती, दगड, खडी, मुरुम व इतर वाहतुकीसाठी गाढवाचा वापर केला जातो. बाजारामध्ये गाढवाचे दात, रंग पाहून त्याची किंमत ठरविली जाते. दोन दातांच्या गाढवांना दुवान, चार दातांच्या गाढवांना चौवान, कोरा, अखंड जवान असे म्हटले जाते. आवश्यकता वाटल्यास त्याला पळवत नेऊन शारीरिक चाचणी घेतली जाते. बाजारात गाढवे विक्रीसाठी आणणारे व्यापारी पौर्णिमेअगोदर गाढवांना भरपूर खायला घालतात. गूळ व तेलही खायला दिले जाते. त्यांच्या अंगावर लाल, निळे, हिरवे असे आकर्षक पट्टे ओढून त्याला सजविले जाते. या बाजारात खरेदीसाठी प्रामुख्याने वैदु, कोल्हटी, मदारी, कुंभार, गारुडी व इतर भटक्या विमुक्त समाजातील बांधव येतात. येथील व्यवहार वायदे बाजारातील व्यापाऱ्यांना लाजवेल असे असतात. खंडोबाच्या साक्षीने अनेक व्यवहार उधारीचे होतात. पुढील वर्षी पसे देण्याचा शब्द दिला जातो. कोणतीही प्रकारची लिखापडी नकरता आजही हे व्यवहार सुरळीत चालू आहेत.
जेजुरीत यंदाही जातपंचायत नाही
जेजुरीत पौष पौर्णिमेला वैदू समाज व भातु कोल्हाटी समाजाच्या जात पंचायतीचे पारंपरिक आखाडे भरले जात असत. परंतु याला बंदी घातल्याने गेल्या वर्षीपासून येथे कुठल्याही जात पंचायती भरलेल्या नाहीत. या वेळीही कोणतीही जात पंचायत येथे भरणार नसल्याचे समजले.
दरम्यान, पौष पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने भाविक जेजुरीत खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत भाविकांनी भंडार-खोबऱ्याची मुक्त उधळण केली. रविवारची सुट्टी व पौर्णिमा प्रारंभ झाल्याने सुमारे एक लाख भाविकांनी गडावर हजेरी लावली. भाविकांना व्यवस्थित मार्ग मिळावा यासाठी सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके व उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महाद्वार रस्त्याच्या परिसरातील व खंडोबा गडाच्या पायरी मार्गावरील सर्व अतिक्रमणे काढली.