पुणे : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा करण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील बाह्यवळण रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) जिल्हा विकास आराखडा समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची परवानगी न घेताच परस्पर प्रशासकीय मान्यता दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी तातडीने निविदेला स्थगिती दिली.

पुरंदर तालुक्यातील श्री खंडोबा देवसंस्थान आणि जेजुरी शहर विकासासाठी राज्य शासनाने सुमारे ३४९.४५ कोटी रुपयांचा श्रीक्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात १०९ कोटी ५७ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मंदिर, संपूर्ण तटबंदीचे जतन आणि दुरुस्तीसाठी ११ कोटी २३ लाख रुपये, दीपमाळांचे जतन आणि दुरुस्तीसाठी ११ कोटी २५ लाख रुपये, उत्तर-पूर्व व पश्चिम पायऱ्या, १३ कमानी, सहायक संरचना जतन आणि दुरुस्तीसाठी १२ कोटी २२ लाख रुपये, ऐतिहासिक होळकर आणि पेशवे तलाव आणि इतर जलकुंडांचे जतन आणि दुरुस्तीसाठी १२ कोटी ५६ लाख रुपये, मल्हार गौतमेश्वर मंदिर, लवथळेश्वर आणि बल्लाळेश्वर मंदिरांचे जतन-दुरुस्तीसाठी दोन कोटी दोन लाख रुपये, कडेपठार मंदिर दोन पायरी मार्गांचे जतन-दुरुस्तीसाठी दहा कोटी ७३ लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मूलभूत पायाभूत सुविधेअंतर्गत १२ कोटी रुपये, भूदृशे विकसित करण्यासाठी १८ लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>भाजप आमदार राम शिंदे यांचा गुंड निलेश घायवळ यांच्यावर वरदहस्त : आमदार रोहित पवार

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) दहा कोटी ६८ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर होऊन पहिल्या टप्प्यात बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे मंजुरी दिल्यानंतर शिखर समितीने देखील मान्यता देऊन नियोजन विभागाने आदेश प्रसृत केला. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात आराखड्याचे काम थंड असताना पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांनी परस्पर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, कार्यकारी समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांना याबाबत कोणतीही कल्पना नसल्याने संबंधित निविदा तातडीने थांबविण्याचे आदेश पीडब्ल्यूडीला पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>पुणे रेल्वे स्थानक परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा पुरातत्त्व विभागाच्या आदेशानुसार राबविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पीडब्ल्यूडीने आराखड्यातील बाह्यवळण रस्त्याची काढलेली निविदा तातडीने रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे सोमवारी मागणी केली आहे.- संजय जगताप, आमदार, पुरंदर

संबंधित निविदा प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. कार्यकारी समितीची नव्याने बैठक घेऊन नव्याने निविदा प्रक्रिया राबिवण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी