scorecardresearch

देवस्थान व पुजाऱ्यांच्या समन्वयातून खंडोबा गडावर दक्षिणा पेटी बसवली

ही सीलबंद पेटी दर आठवडय़ाला तहसीलदार व पंचासमक्ष उघडली जाणार असून त्यातील उत्पन्न देवस्थान व पुजारीवर्गामध्ये प्रत्येकी पन्नास टक्क्यांप्रमाणे वाटले जाणार आहे.

जेजुरी येथील खंडोबा मंदिरातील उत्पन्नाबाबत सहधर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची शनिवारपासून (२८ मार्च) अंमलबजावणी सुरू झाली. मरतड देवसंस्थान व पुजारी यांच्या समन्वयातून तहसीलदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत देवासमोर दक्षिणापेटी बसवण्यात आली. पाटील यांनी पेटीची पूजा करून पाचशे रुपयाची नोट पेटीत टाकून योजनेचा प्रारंभ केला.
ही सीलबंद पेटी दर आठवडय़ाला तहसीलदार व पंचासमक्ष उघडली जाणार असून त्यातील उत्पन्न देवस्थान व पुजारीवर्गामध्ये प्रत्येकी पन्नास टक्क्यांप्रमाणे वाटले जाणार आहे. पूजा, अभिषेक पासासाठी पंचवीस रुपये द्यावे लागणार आहेत. देवस्थानमधील उत्पन्नाबाबत गेली अनेक वर्ष वाद होत होते. हे वाद विसरून देवस्थानच्या विकासासाठी व भाविकांच्या सेवेसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, सुधीर गोडसे, संदीप घोणे, वसंत नाझीरकर, किशोर म्हस्के, उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, माजी विश्वस्त राजेंद्र बारभाई, सुनील असवलीकर, नितीन बारभाई, सुधाकर मोरे, किरण मोरे, सुरेश लांघी, शामराव लांघी, बाळकृष्ण दीडभाई, प्रशांत सातभाई आदी या वेळी उपस्थित होते. यानंतर देवस्थानच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार पाटील म्हणाले, की आजपर्यंत विश्वस्त मंडळ व पुजारीवर्ग यांच्यात सुसंवाद होत नसल्याने गरसमज होत होते. मात्र, आता सर्वाच्या सहकार्याने या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. जेजुरीच्या इतिहासातील हा सुवर्णअक्षराने लिहावा असा क्षण आहे. पुजाऱ्यांच्या कोणत्याही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी देवसंस्थान सदैव तत्पर राहील.
मंदिरावर सोन्याचा कळस व चांदीचा गाभारा करण्यासाठी देवसंस्थानने प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्य विश्वस्त डॉ. खंडागळे यांनी दिली. ते म्हणाले, की प्रशासनाला आम्ही कायमच मदत करीत आलो आहोत. गावातील काही राजकारणी मंडळींनी पुजारी व देवसंस्थानला एकत्र येऊ दिले नाही. त्यामुळे वाद होत राहिले. यापुढे जेजुरीचे महत्त्व वाढविण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे विचार माजी विश्वस्त राजेंद्र बारभाई यांनी व्यक्त केले. या वेळी विश्वस्त संदीप घोणे, सहायक पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांचीही भाषणे झाली. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jejuri income distribution

ताज्या बातम्या